सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्यात १२ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अद्याप सुरुवात न झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दुसरीकडे, शिक्षण विभागाने १२ वी प्रवेशासाठी घातलेल्या जाचक अटींमुळे शाळा/महाविद्यालय बदलू इच्छिणारे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. विद्यार्थी शैक्षणिक ताणामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना समोर येत असतानाही, शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ११ वीसाठी संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. याच धर्तीवर आता शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता १२ वीच्या प्रवेशासाठी देखील ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले असून, कोणत्याही परिस्थितीत १२ वीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
हे आदेश पुणे विभागातील (अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर) सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी २०२५-२६ मध्ये ११ वीत ऑनलाईन प्रवेश घेतला होता, परंतु आता शाखा बदल, पालकांची बदली, वैद्यकीय कारण किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीमुळे त्याच जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीसाठी प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर विशेष सुविधा दिली जाईल. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असतानाही अजून हे पोर्टल सुरू झालेले नाही. त्यामुळे 'शिक्षण विभाग नेमकी कोणाची वाट पाहत आहे?' असा संतप्त प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाच्या नियमांनुसार, कोणत्याही परिस्थितीत इयत्ता १२ वीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमानुसार निश्चित केलेले प्रवेश शुल्कच आकारावे; त्यापेक्षा अधिकचे शुल्क किंवा कोणत्याही प्रकारची देणगी (डोनेशन) घेऊ नये, असेही निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.
११ वीत प्रवेश घेतल्यानंतर अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना १२ वीसाठी दुसरे महाविद्यालय हवे असते. मात्र, दुसऱ्या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी शिक्षण विभागाने अत्यंत जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांऐवजी शैक्षणिक संस्थांचे हित पाहत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या जाचक नियमांमुळे विद्यार्थी आणि पालक सध्या मोठ्या तणावाखाली वावरत आहेत. १२ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी आणि अकरावीच्या महाविद्यालयातून दुसरीकडे प्रवेश घेताना, जर संबंधित दुसऱ्या महाविद्यालयात जागा शिल्लक असतील, तर प्रवेशाचे नियम शिथिल करावेत, अशी आग्रही मागणी पालकांकडून केली जात आहे. यावर आता शिक्षण मंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.