loader
Breaking News
Breaking News
Foto

एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतुकीचा जीवघेणा खेळ! सोनवी पुलावर आणखी एक भीषण अपघात

​शास्त्रीपूल (वहाब दळवी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर प्रशासनाने सुरू केलेला एकाच मार्गिकेवरील दुहेरी वाहतुकीचा जीवघेणा प्रयोग आता वाहनचालकांच्या जीवावर उठला आहे. आज, शुक्रवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास याच धोकादायक नियोजनामुळे दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी प्रचंड होती की, एका वाहनाचे पाठीमागील चाक अक्षरशः फाटून बाहेर आले आणि दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही गाड्यांमधील प्रवासी या भयानक अपघातातून हुकमी बचावले असले, तरी प्रशासनाच्या या जीवघेण्या कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सोनवी पुलाच्या एका मार्गिकेचे काम घाईगडबडीत आटोपून तेथून वाहतूक सुरू तर करण्यात आली, मात्र दोन्ही बाजूंनी येणारी शेकडो वाहने याच एका वळणदार मार्गिकेवरून सुसाट वेगाने धावत आहेत. हा पूल तीव्र आणि अवघड वळणाचा असल्याने समोरून नेमके कोणते वाहन येत आहे, याचा अंदाज चालकांना अजिबात येत नाही. गोव्याच्या दिशेने जाणारे वाहन एमएच ४३ एएल १७१५ आणि मुंबईच्या दिशेने येणारे वाहन एमएच ४७ सीडी ६९४७ याच वळणावर समोरासमोर आले. मार्गिका एकच आणि वेग प्रचंड असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा मोठा अपघात घडला. एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सोडल्यामुळेच गेल्या अवघ्या आठ दिवसांत या पुलावर झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे. ​काही दिवसांपूर्वीच येथे कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन तिघे जण जखमी झाले होते, ज्याची नोंद संगमेश्वर पोलिसांत आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच एका 'छोटा हत्ती' आणि चारचाकी वाहनामध्ये अशीच जोरदार धडक झाली होती, मात्र त्याची पोलीस ठाण्यात तक्रार झाली नव्हती. यापूर्वी झालेल्या अपघातांच्या वेळीही वृत्तमाध्यमांनी ओरडून ओरडून प्रशासनाला सावध केले होते की, एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची सुसाट वाहतूक चालवणे म्हणजे अपघातांना थेट आमंत्रण देणे आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या गंभीर इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली.

टाईम्स स्पेशल

​प्रशासनाच्या याच एका चुकीच्या आणि हलगर्जी निर्णयामुळे दररोज शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. एकाच वेळी दोन्ही बाजूंची वाहने या धोकादायक वळणावर समोरासमोर येणे तात्काळ थांबवले पाहिजे. जोपर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत या एका मार्गिकेवरून फक्त एका वेळी एकाच बाजूची वाहने सोडण्याची कडक व्यवस्था तिथे तैनात करणे अनिवार्य आहे. प्रशासनाने तात्काळ येथे वाहतूक नियंत्रक किंवा पोलीस तैनात करून ही दुहेरी वाहतूक बंद करावी आणि एकेरी वाहतूक सुरू करावी, अन्यथा या पुलावर होणाऱ्या पुढील गंभीर दुर्घटनेला सर्वस्वी प्रशासन आणि महामार्ग ठेकेदारच जबाबदार असतील, अशी संतप्त चर्चा सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg