loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये सैनिक संकुलासाठी अधिवेशनात बैठक; राज्यपालांकडे शिफारस करणार - मंत्री शंभूराजे देसाई यांचे आश्वासन

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिक, माजी सैनिक, वीर माता-पिता, वीरनारी, सैनिक विधवा व त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी चिपळूण येथे सैनिक संकुल उभारण्याच्या मागणीला आता वेग आला असून, यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात विशेष बैठक घेण्यात येईल. त्यानंतर राज्यपाल महोदयांकडे स्वतःच्या पत्राद्वारे शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार शेखर निकम आणि जिल्ह्यातील माजी सैनिक प्रतिनिधींना दिले. मंगळवारी सकाळी मंत्रालयात आमदार शेखर निकम यांच्यासह माजी सैनिकांना घेऊन मंत्री देसाई यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या समस्या मांडल्या. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, दुर्गम भाग आणि मोठ्या प्रमाणातील सैनिक कुटुंबीयांना सीएसडी, ईसीएचएस तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी होणारा मानसिक व आर्थिक त्रास याकडे त्यांनी लक्ष वेधले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खेड व चिपळूण तालुक्यात माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांची संख्या सर्वाधिक असून चिपळूण हे मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रस्तावित जागा सर्व शासकीय कार्यालये व एस.टी. स्थानकाजवळ उपलब्ध असल्याने सैनिक संकुलासाठी चिपळूण हे सर्वात योग्य व सोयीचे ठिकाण ठरते. सन २००७ पासून जिल्ह्यातील माजी सैनिक व सैनिक विधवांकडून सैनिक संकुलाची सातत्याने मागणी केली जात आहे. चिपळूण येथील विद्यमान सैनिकी वसतिगृह हे सन १९४४ मधील जुने बांधकाम असून त्याचे नुतनीकरण अत्यावश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नवीन सैनिक संकुलासाठी आवश्यक परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे व इतर सर्व पूर्तता करून प्रस्ताव सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष निधी व्यवस्थापकीय समितीकडे सादर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, सैनिक संकुलासाठी आवश्यक निधी सैनिक कल्याण विभागाकडे उपलब्ध असून या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मंत्री देसाई यांनी यापूर्वीही चिपळूण येथे सैनिक संकुल उभारणीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, १३ मे २०२६ रोजी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या सैनिक संकुल प्रस्तावांवर चर्चा झाली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचा प्रस्ताव सर्व बाबींची पूर्तता केलेला असूनही त्यास मंजुरी मिळाली नाही. उलट सातारा जिल्ह्यात सैनिक संकुल उभारणीला मान्यता देण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या भावना शासन गंभीरतेने घेत आहे. येणाऱ्या अधिवेशनात यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. त्यानंतर राज्यपाल महोदयांकडे माझ्या पत्राद्वारे चिपळूण सैनिक संकुलाबाबत शिफारस करण्यात येईल,” असे स्पष्ट आश्वासन दिले. या बैठकीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून चिपळूण येथे सैनिक संकुल उभारणीच्या मागणीला नव्याने बळ मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg