loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर पंचक्रोशीत हत्तींचा धुडगूस; थेट वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये घबराट

​दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील कोलझर पंचक्रोशीत गेल्या महिनाभरापासून धुडगूस घालणाऱ्या हत्तींच्या कळपाने आता थेट लोकवस्तीत प्रवेश केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सावंतवाडी तालुक्यातून भरकटलेला 'ओंकार' नावाचा हत्ती या कळपात सामील झाल्याने आता हत्तींची संख्या सहावर पोहोचली आहे. बागायती आणि डोंगराळ भागात उच्छाद मांडणारा हा कळप आता थेट लोकांच्या अंगणापर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. मुसळधार पावसामुळे हत्तींचे अचूक लोकेशन मिळत नसल्याने वनविभागाची रात्रगस्त सध्या कुचकामी ठरत आहे. ​मध्यरात्री या सहा हत्तींच्या कळपाने कोलझरमधील अनिल सावंत, अशोक देसाई, श्रीराम देसाई, दत्ताराम देसाई आणि बाबाजी देसाई यांच्या घरांजवळील अंगणात आणि बागांमध्ये घुसून केळी, सुपारी, नारळ व काजूच्या झाडांचे अतोनात नुकसान केले. हा कळप दाट लोकवस्तीच्या आणि मुख्य रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हत्तींच्या उपद्रवामुळे कोलझरमधील सेवानिवृत्त शिक्षक कै. अमृत देसाई आणि मेघश्याम देसाई यांनी ओसाड माळरानावर रक्ताचे पाणी करून फुलवलेली ६८ माडांची (नारळाची) बाग पूर्णपणे नष्ट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी हत्तींनी या बागेत पहिल्यांदा नुकसान केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने झाडे पाडत, गेल्या रात्री हत्तींनी बागेतील शेवटचा माडही उद्ध्वस्त केला. मागच्या पिढीचे कष्ट आणि स्वप्न कायमचे जमिनीदोस्त झाल्याने देसाई कुटुंब कमालीचे हतबल झाले आहे. केवळ शासकीय नुकसान भरपाई हा यावर कायमस्वरूपी तोडगा नसून, लोकप्रतिनिधींनी या संकटातून मार्ग काढावा, अशी मागणी नुकसानग्रस्त अनिल देसाई यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी रात्री अचानक कोलझर परिसराला भेट दिली. अधिकाऱ्यांनी स्वतः गस्ती पथकासोबत फिल्डवर उतरून हत्तींना वस्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. ड्रोन व इतर तांत्रिक गरजा तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हत्तींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात 'हँगिंग सोलर कंपाऊंड' उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी दीपक देसाई, अजित सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी केली. दरम्यान, हा कळप सध्या शिरवल येथील सोनजांभळी भागात स्थिर असून, तो केरमार्गे परतीच्या प्रवासाला कधी लागणार, याकडे आता स्थानिकांचे डोळे लागले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg