loader
Breaking News
Breaking News
Foto

निसर्गप्रेमी जोवेल डिसिल्वा यांचा फळझाडांच्या बिया रोपण करून निसर्गाचे संवर्धनासाठी पुढाकार

सावंतवाडी (प्रतिनिधी) ​निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या उष्णतेपासून वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सावंतवाडीतील निसर्गप्रेमी जोवेल डिसिल्वा यांनी एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. वन्यजीवांना जंगलातच अन्न आणि पाणी मिळावे, यासाठी त्यांनी जंगलामध्ये फळझाडांच्या बियांची लागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. ​यावर्षी तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली. नद्या आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. "अशी अभूतपूर्व उष्णता आम्ही आयुष्यात कधी पाहिली नाही," अशी प्रतिक्रिया घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. वाढती सिमेंटची जंगले, रस्ते आणि कौलारू घरांचे कमी होत जाणारे प्रमाण यांमुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे सध्या अन्न-पाण्याच्या शोधात गवारेडे, बिबटे, माकडे यांसारखे जंगली प्राणी गावांकडे आणि शहरांकडे धाव घेत आहेत. परिणामी, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या गंभीर समस्येवर जोवेल डिसिल्वा यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग शोधून काढला आहे. वन्यजीवांना जर जंगलातच पुरेसे अन्न मिळाले, तर ते मानवी वस्त्यांकडे वळणार नाहीत, या विचारातून त्यांनी थेट जंगलात जाऊन वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. सध्या सर्वसामान्य माणूस स्वतःच या कडक उन्हाळ्याने हैराण असल्याने प्राण्यांकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. वास्तविक पाहता, निसर्गाचा समतोल राखणे आणि जंगलांचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. वाढत्या तापमानामुळे जंगलात लागणारे वणवे आणि त्यात होरपळून मरणारे वन्यजीव ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत उर्वरित प्राण्यांचे संरक्षण करणे हे मानवी कर्तव्य मानून डिसिल्वा यांनी हा पर्याय निवडला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून अनेक नागरिक आणि पर्यटक वर्षा पर्यटनासाठी (पावसाळी पर्यटनासाठी) बाहेर पडत आहेत. अशा वेळी पर्यटनाला जाताना नागरिकांनी सोबत आंबा, जांभूळ, फणस, काजू यांसारख्या स्थानिक फळांच्या बिया संकलित करून त्या जंगलात पेराव्यात, असे आवाहन जोवेल डिसिल्वा यांनी केले आहे. ते स्वतः दर सुट्टीच्या दिवशी जंगलात जाऊन अशा विविध प्रकारच्या बिया पेरण्याचे काम सातत्याने करत आहेत. यामुळे भविष्यात खारुताई, वानरे, शेकरू आणि विविध पक्षी यांना जंगलातच हक्काचे अन्न उपलब्ध होणार आहे.

टाईम्स स्पेशल

जोवेल डिसिल्वा यांनी केवळ सावंतवाडीतच नव्हे, तर देवगड आणि वेंगुर्ला येथील आपल्या कामाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले आहे. यासोबतच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत, त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाबाबत मोठी जनजागृती निर्माण केली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि वन्यजीवांना हक्काचा निवारा व अन्न मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या पावसाळ्यात जमेल तिथे बिया पेरून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg