loader
Breaking News
Breaking News
Foto

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचे आव्हान; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासकीय कसरतीकडे लक्ष

रत्नागिरी :​ राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला, तरी रत्नागिरी जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि वाळू डेपोची मर्यादित संख्या पाहता, या मोफत वाळूचा लाभ घेताना लाभार्थ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या केवळ पाच वाळू गटांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी चार चिपळूणमध्ये तर एक राई भातगाव येथे आहे. नियमानुसार, उत्खनन केलेल्या एकूण वाळूच्या १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात साधारण ८५७० ब्रास वाळू उपसा होतो, त्यातील १० टक्के म्हणजे केवळ ८५७ ब्रास वाळू मोफत उपलब्ध होऊ शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, जिल्ह्यातील मंजूर घरकुलांची एकूण संख्या विचारात घेता, त्यांना सुमारे १ लाख २५ हजार ब्रास वाळूची आवश्यकता आहे. उपलब्ध साठा आणि गरज यामध्ये मोठी तफावत असल्याने ही योजना कागदावरच राहते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. ​नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये वाहतुकीचा अडथळा सर्वात मोठा आहे. सध्या वाळूचे डेपो केवळ खेड, दापोली आणि चिपळूणमध्येच उपलब्ध आहेत. यामुळे राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर आणि मंडणगड यांसारख्या लांबच्या तालुक्यातील लाभार्थ्यांना वाळू नेण्यासाठी स्वतःचे वाहन घेऊन डेपोवर जावे लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

वाळू मोफत मिळत असली, तरी लांबच्या प्रवासाचा वाहतूक खर्च हा वाळूच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ही वाळू 'मोफत' कशी ठरेल, असा सवाल लाभार्थी विचारत आहेत. ​या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तालुकास्तरावर वाळू डेपो होणे अत्यंत आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या घरापर्यंत कमीत कमी खर्चात वाळू कशी पोहोचवता येईल, यादृष्टीने जिल्हा प्रशासन आता कोणता मार्ग अवलंबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन वाहतूक खर्चात सवलत देणार की पर्यायी वितरण व्यवस्था उभी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाळूचा हा प्रश्न वेळीच सुटणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg