loader
Breaking News
Breaking News
Foto

सीईटी सेलचा ’विभागीय सुसंवाद २०२६’ उत्साहात संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) संदर्भातील विभागीय सुसंवाद कार्यक्रम आज यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने तसेच देवी शारदेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी सीईटी सेलचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तंत्र शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक कुणाल देवकर, कला शिक्षण विभागाचे सहाय्यक परीक्षा समन्वयक शार्दुल कदम, वैद्यकीय व आयुष विभागाचे परीक्षा समन्वयक सिद्धेश नर, उच्च शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक नानासाहेब फटांगरे तसेच तंत्र शिक्षण विभागाचे सहाय्यक परीक्षा समन्वयक पी. एम. झरकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तंत्र शिक्षण विभागाचे पी.एम.झरकर यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे आणि शासनाची अधिकृत माहिती थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले. त्यानंतर कला शिक्षण विभागाचे शार्दुल कदम यांनी फाईन आर्ट्स व संबंधित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया, करिअरच्या संधी आणि उपलब्ध पर्यायांची माहिती दिली. वैद्यकीय व आयुष विभागाचे सिद्धेश नर यांनी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

तंत्र शिक्षण विभागाचे कुणाल देवकर यांनी एमएचटी-सीईटी अंतर्गत येणार्‍या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची, सीएपी फेर्‍यांची, कागदपत्र पडताळणीची आणि अभ्यासक्रम निवडीसंदर्भातील महत्त्वाच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी अशा प्रकारचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक बॉनी शेरॉव्ह यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg