loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरु असलेल्या कामामुळे लांजा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विद्युत पोल उभारणीच्या कामामुळे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेत अडचण निर्माण झाली असून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर आणि पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर यांनी गुरुवारी महावितरण अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. लांजा शहरातील महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत विद्युत पोल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या घरगुती नळ कनेक्शनच्या लाईन्स वारंवार फुटत आहेत. तर अनेक ठिकाणी गळतीच्या घटनाही घडत आहेत. या गळती दुरुस्त करण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचे नगरपंचायत कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले, परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि प्रसंगी नागरिकांचा रोषाला नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याची गरज अधिक असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय अनेक ठिकाणी विद्युत पोल थेट नगरपंचायतीच्या पाईपलाईनवर किंवा अगदी लगत उभारले जात असल्याने भविष्यात पाईपलाईनची दुरुस्ती अथवा नवीन नळजोडणीचे काम करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नगरपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. तर विद्युत पोलांच्या सान्निध्यात खोदकाम करणे धोकादायक ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मुख्यतः नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा (डीपीआर) मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पाईपलाईन टाकण्याचे आणि खोदकामाचे काम होणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत उभारण्यात येणारे विद्युत पोल या कामात अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने नगरपंचायतीने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात नगरपंचायतीने महावितरणच्या लांजा व रत्नागिरी कार्यालयांशी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. २३ मार्च ते ३ जून या कालावधीत वेळोवेळी पत्रांद्वारे पाईपलाईनवर किंवा तिच्या लगत उभारण्यात येणारे विद्युत पोल किमान दोन फूट अंतरावर हलविण्याची मागणी करण्यात आली होती.

टाईम्स स्पेशल

मात्र यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा नगरपंचायतीकडून सांगण्यात आले. दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर व पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर यांनी ऍक्शन मोडवर येत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत नागरिकांच्या पाणी प्रश्नाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे, नागरिकांना वेळोवेळी आम्हाला उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे तातडीने पाईपलाईनपासून किमान दोन फूट अंतरावर विद्युत पोल उभे करून पाणी पुरवठ्यात होणार्‍या अडचणी दूर कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या रोषाला तुम्हालाही सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी महावितरण अधिकारी व ठेकेदार कंपनीला त्यांनी दिला. याप्रसंगी घटनास्थळी पाहणी करताना नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, पाणी पुरवठा सभापती रफिक नेवरेकर, महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी, विद्युत पोल ठेकेदार कंपनीचे कर्मचारी, महामार्ग ठेकेदार कंपनीचे नरेश सितलानी, नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे राजेश लांजेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg