loader
Breaking News
Breaking News
Foto

​'तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार' सोहळ्यात कोकणच्या साहित्यिकांचा सत्कार

​सावंतवाडी : तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित 'तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार' प्रदान सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्गच्या तीन साहित्यिकांचा आणि त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव करण्यात आला. कोल्हापूर येथे हा सोहळा संपन्न झाला. या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'कोमसाप' सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांच्या 'बकुळीची फुले' काव्यसंग्रहाला "सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह", मालवण शाखेच्या सदस्या उज्ज्वला धानजी यांच्या 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' लेखसंग्रहाला "सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह" आणि ९८ वर्षीय ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय शिवराम (द. शि.) हिर्लेकर यांच्या 'कर्तव्यपूर्ती' या पुस्तकाला "सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिर्लेकर गुरुजी यांच्यावतीने त्यांचा मुलगा शशांक हिर्लेकर याने हा पुरस्कार स्वीकारला. एकाच जिल्ह्यातील तीन साहित्यिकांनी हा बहुमान पटकावल्यामुळे 'कोमसाप'च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कोकणातील साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्याच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष तथा राष्ट्रपती पदक विजेते पर्यावरण तज्ञ ॲड. तुषार शिवशरण, 'सोल्यूशन माईंड'चे सुजित दातार, माजी आमदार जयश्री जाधव, कोळी लोककलाकार राजेश खर्डे वेसावकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री शमा वैद्य, अभिनेत्री वैशाली राजशेखर, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेत्री चित्रा साठे, शंकर अंदानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. तितिक्षाच्या अध्यक्षा प्रिया दामले यांनी प्रास्ताविकात संस्थेची भूमिका मांडली. "मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात," असे त्यांनी स्पष्ट केले. स्वागताध्यक्ष ॲड. तुषार शिवशरण यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत तितिक्षाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर माजी आमदार जयश्री जाधव यांनी सन्मानप्राप्त सर्व साहित्यिकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आयोजकांच्या वतीने प्रिया दामले आणि सुजित दातार यांनी सर्व पाहुण्यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

पुरस्कार सोहळ्यानंतर निमंत्रित कवींचे कवी संमेलन पार पडले. यामध्ये पुरस्कारविजेते कवी दीपक पटेकर यांनी सादर केलेली "डोळ्यात बापाच्या मला सुखदुःख सारे काय दिसते.... अन् पापणी लवताच माझी राबणारी माय दिसते" ही भावस्पर्शी रचना रसिकांच्या पसंतीस उतरली. ​कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात, लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा शाल, मानाची टोपी, साडी आणि मुंडावळ्या बांधून, मंगलाष्टकांच्या मंजुळ स्वरात विशेष गौरव सोहळा संपन्न करण्यात आला. हा भव्य सोहळा तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, सोल्यूशनमाईंड पुणे व श्रीद्या क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केलेल्या अजिता मुळीक, गौरव पुंडे आणि भालचंद्र शिर्के यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रिया दामले आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg