loader
Breaking News
Breaking News
Foto

सह्याद्रीत उभा राहिला भव्य स्काय ब्रिज; खेड–महाबळेश्वर प्रवास होणार अधिक वेगवान

खेड (प्रतिनिधी) - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अधिक जवळ आणणारा महत्त्वाकांक्षी केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वास आला असून पावसाळ्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा हा भव्य पूल पर्यटन, उद्योग आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुंबईतील वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी सुमारे १७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ५४० मीटर लांबी आणि १४ मीटर रुंदी असलेला हा केबल स्टेड स्काय ब्रिज सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना ठरत आहे. या पुलामुळे खेड ते महाबळेश्वर दरम्यानचे अंतर सुमारे ५० किलोमीटरने कमी होणार असून पोलादपूरमार्गे आंबेनळी घाटाचा मोठा फेरा टळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच इंधनाचीही मोठी बचत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तापोळा परिसरातून कोकणातील गाढवली-आहिर भागाला जोडणारा हा पूल कोयना बॅकवॉटर परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली असून पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट परिसराचे नैसर्गिक सौंदर्य, दुर्मीळ लाल खेकड्यांचे दर्शन आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढणार आहे. पुलाच्या मध्यभागी तब्बल ४३ मीटर उंचीची व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली असून तेथे जाण्यासाठी आधुनिक कॅप्सूल लिफ्ट तसेच जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणावरून कोयना बॅकवॉटर, सह्याद्री पर्वतरांग आणि सूर्योदय-सूर्यास्ताची मनमोहक दृश्ये पाहता येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

नवीन पुलामुळे कांदाटी खोऱ्यातील अनेक दुर्गम गावांचा संपर्क वर्षभर कायम राहणार आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या शिंदी, वळवण, उचाट, आकल्पे, दरे यांसह २१ गावांना सुरक्षित आणि सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच बार्जद्वारे करावा लागणारा धोकादायक प्रवासही बंद होणार असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे कोकण आणि सातारा जिल्ह्यांमधील व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला नवी गती मिळणार आहे. स्थानिक युवकांसाठी पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला हा स्काय ब्रिज केवळ वाहतुकीचा दुवा नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा नवा मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg