loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर-नावडी ग्रामपंचायत हद्दीतील सोनवी नदीपात्रात कोंबड्यांच्या घाणीचे साम्राज्य

शास्त्रीपूल (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील नावडी ग्रामपंचायत हद्दीतील सोनवी नदीपात्रात कोंबडी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचे कातडे, पंख व इतर जैविक कचरा टाकला जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित होत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची घाण नदीपात्रात टाकल्यानंतर भरतीच्या वेळी हा कचरा वाहून लोवले गावाच्या हद्दीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून नदीकाठावरील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोनवी नदीपात्रात अनेक ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंप बसविले आहेत. मात्र नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत छावा मराठा योद्धा संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वहाब दळवी यांनी नावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक शेरे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. यावेळी उपसरपंच विवेक शेरे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमार्फत संबंधित कोंबडी विक्रेत्यांना अनेक वेळा नोटिसा बजावून नदीपात्रात घाण टाकू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र वारंवार सूचना देऊनही काही विक्रेते नियमांचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या ५ जून रोजी नावडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून या ग्रामसभेमध्ये संबंधित कोंबडी विक्रेत्यांना उपस्थित राहण्यास सांगून त्यांना समज देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, सोनवी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास छावा मराठा योद्धा संघटनेच्या वतीने १५ जून रोजी संगमेश्वर येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वहाब दळवी यांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg