loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड फळसोंडा येथे दुचाकीची गाईला धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील फुरूस गावाला पोयनारशी जोडणार्‍या रस्त्यावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास चिखलकर हे ३० मे रोजी त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून (एमएच ०८ ए ०७४१) पाणी आणण्यासाठी फुरूसच्या दिशेने जात होते. फळसोंडा जामा मशीद परिसरात पोहोचताच अचानक एक गाय रस्त्यावर आली. गाय समोर आल्याने त्यांना वाहनावरील नियंत्रण राखता आले नाही आणि दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या धडकेत चिखलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे चिखलकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. विकास चिखलकर हे सर्वपरिचित आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्या निधनाने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर फुरूस—पोयनार मार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या मार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे हा रस्ता फळसोंडा मोहल्ल्यातील दाट वस्तीमधून जात असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचार्‍यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत लवकरच प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय परिसरात मोकाट जनावरांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे. यापूर्वीही भटक्या जनावरांमुळे या मार्गावर अनेक अपघात घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. विकास चिखलकर यांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg