loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत विकासकामांच्या थकलेल्या देयकांमुळे तरुण ठेकेदार अडचणीत; कोट्यवधींचा निधी रखडला

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये 25-15 हेड अंतर्गत बांधकाम विभागामार्फत 131हून अधिक कामे मंजूर असून त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. छोटी-छोटी विकास कामे असल्याने तरुण सुशिक्षित बेरोजगारांकडून यातील अनेक कामे करुन घेतली जातात. मात्र या कामाची देयके गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्याप्रमाणात थकली आहेत. जिल्ह्यासाठी सुमारे सात कोटींची मागणी असून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक छोट्या तरुण ठेकेदारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अखत्यारीत हा विभाग असल्याने जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करुन देतात याकडे या तरुणांचे लक्ष लागून राहिले आहे. बांधकाम विभागाच्या 25-15 हेड अंतर्गत एक ते पाच लाखापर्यंत छोटी विकास कामे केली जातात. ही कामे विशेष करुन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिली जातात. यात अनेक तरुण ठेकेदार ही विकास कामे करीत असतात. मात्र गेली तीन-चार वर्ष या विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे पैसे अडकून पडले आहेत. अनेक तरुणांनी घरातील दागिने गहान ठेवून पतसंस्थांमधून पैसे घेऊन ही कामे केली आहेत. परंतु झालेल्या कामांचे पैसेच मिळत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागर या चिपळूण बांधकाम विभागाकडून 25-15अंतर्गत चिपळूण तालुक्यात 50 कामे सन 2023-24मध्ये मंजूर झाली होती. यातील 49 कामांचा कार्यारंभ आदेश देऊन 46 कामे पूर्ण झाली आहेत. एक काम सुरु असून दोन अद्याप सुरु झालेली नाहीत तर एक काम रद्द करण्यात आले. यासाठी 4 कोट 46 लाखाचा निधी मंजूर झाला होता. विकास कामांवर तीन कोटी 65 लाखाचा निधी खर्च पडला. मात्र यासाठी आवश्यक असणारा निधी अद्याप न आल्याने ठेकेदारांची बिले मात्र थकली आहेत. तिच अवस्था रत्नागिरी बांधकाम विभागाची आहे. सन 2023-24 मध्ये रत्नागिरी व संगमेश्वरमध्ये 86 कामे मंजूर झाली होती. त्यासाठी साडेपाच कोटीचा निधी मंजूर झाला. तर 3 कोटी 96 लाखाचा निधी प्राप्त झाला. यासाठी आणखी दीड कोटीहून अधिकचा निधी रखडला आहे. सन 2024-25मध्ये संगमेश्वर व लांजामध्ये 46 कामे करण्यात आली. यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातील सव्वा कोटीचा निधी प्राप्त झाला तर जवळपास पावणेदोन कोटींचा निधी आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी विभागासाठी झालेल्या कामांचा एकूण सव्वातीन कोटीहून अधिकचा निधी रखडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सहा ते सात कोटी रुपये झालेल्या कामांचे थकले आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे हाल झाले असून, बांधकाम कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून थकले आहेत. जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेचे तरुण मंत्री योगेश कदम यांच्याकडे राज्यात ग्रामविकास राज्यमंत्रीपद असून त्यांच्या अखत्यारीत हा विषय असल्याने, ते जास्तीतजास्त निधी उपलब्ध करुन देतील याकडे गेल्या अनेक महिन्यांपासून सुशिक्षित बेरोजगारांचे लक्ष लागून राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg