loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट, मंत्री नितेश राणे यांच्या दालनात विशेष बैठक संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक पार पडली. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पूर्णपणे अबाधित ठेवत, पर्यटन आणि सौंदर्यीकरणासह या परिसराला आकर्षणाचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले, युवराज लखमराजे भोसले, वास्तुविषारद स्वरदा पोयरेकर, अजय नायक आणि श्रद्धा कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी मोती तलाव पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी उपस्थित आमदार दीपकभाई केसरकर आणि सावंतवाडी राजघराण्यातील सदस्य युवराज्ञी तथा नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले व युवराज लखम सावंत भोसले यांचे विशेष स्वागत केले. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी शासन आणि राजघराण्याने एकत्र येऊन केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे एक उत्तम प्रतीक असल्याचे गौरवोद्गार यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले. आजच्या आधुनिक काळात 'हेरिटेज' म्हणजेच वारसा पर्यटन केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. हीच गरज ओळखून 'थर्टी स्क्वेअर' आणि 'आरजेबी-सीपीएल' (रतन जे. बटलीबॉय कन्सल्टंट्स प्रा. लि.) यांनी त्यांचे पर्यावरण भागीदार 'एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट' (इडेन एलएलपी) यांच्या सोबतीने एक सर्वसमावेशक विकास आराखडा या बैठकीत सादर केला. हा संपूर्ण प्रकल्प 'लोकांसाठी, जागेसाठी आणि पाण्यासाठी' अशा तीन मुख्य मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सावंतवाडीची सांस्कृतिक आणि सौंदर्यविषयक ओळख जपत अत्यंत विचारपूर्वक आधुनिक विकास करणे हा आहे. मोती तलाव हा एकेकाळी शहरातून वाहणाऱ्या पाण्याचा मुख्य नैसर्गिक साठा होता, त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून तलावाच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे, पाणी स्वच्छ करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि तलावाच्या संरक्षक भिंतींचे मजबुतीकरण करणे यावर या प्रस्तावात विशेष भर देण्यात आला आहे. स्थानिक संस्कृतीचा सन्मान करत जागतिक पर्यटनाला शाश्वत पद्धतीने आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या माध्यमातून स्थानिक पर्यावरण, संस्कृती आणि आर्थिक उपजीविका मजबूत करण्यासाठी विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड पार्क आणि नौकाविहार सुविधा, उत्सव प्लाझा व पारंपरिक घाट, दशावतार नाटक आणि इतर स्थानिक कलाप्रकारांसाठी खुलं नाट्यगृह (ॲम्फीथिएटर) विकसित केले जाईल. संपूर्ण तलाव परिसर पारंपरिक घाटांच्या संकल्पनेवर आधारित शांत व निसर्गरम्य बनवला जाईल. एकंदरीत, मोती तलावाचे हे प्रस्तावित पुनरुज्जीवन सावंतवाडीच्या प्रगतीशील भविष्याची दिशा दर्शवणारे ठरेल. हा प्रकल्प ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक विकास, स्थानिक समुदाय आणि पर्यटन, तसेच पर्यावरणीय जबाबदारी आणि आर्थिक संधी यांचा अत्यंत सुंदर समतोल साधणारा ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg