loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर जिल्हा मच्छिमार संघावर नव्या संचालक मंडळाचा अधिकृत ताबा

दापोली (प्रतिनिधी) : गेल्या जवळपास तीन वर्षांपासून न्यायालयीन व प्रशासकीय संघर्षानंतर अखेर रत्नागिरी जिल्हा मच्छिमार सहकारी संघ, पेठ किल्ला येथील अधिकृत ताबा नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाकडे आला आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील मच्छिमार समाजात समाधानाचे वातावरण असून, लोकशाही प्रक्रियेला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. सन २०२३ मध्ये झालेल्या जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळ लोकशाही मार्गाने निवडून आले होते. मात्र तत्कालीन अध्यक्ष बाबा मियाँ मुकादम यांनी निवडणूक निकाल मान्य न करता काही संचालकांविरोधात सहकार न्यायालय, अलिबाग तसेच मुंबई येथे दावे दाखल केले. न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने संबंधित दावे फेटाळले गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न्यायालयीन लढाईत यश न मिळूनही संस्थेचा प्रत्यक्ष कारभार नव्या संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या संचालक मंडळाने सहकार आयुक्तांकडे दाद मागितली. त्यानंतर सहकार आयुक्तांनी ३ जून २०२६ रोजी संस्थेचा अधिकृत ताबा नव्या संचालक मंडळाकडे देण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर जिल्हा मच्छिमार संघाच्या कार्यालयाचा अधिकृत ताबा नव्या संचालक मंडळाने स्वीकारला असून, संस्थेचा कारभार आता नियमानुसार आणि लोकशाही पद्धतीने चालविण्याचा निर्धार संचालकांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरेश्वर कालेकर व उपाध्यक्ष केशव नारायण वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीच्या तहसिलदार, पोलीस निरीक्षक रत्नागिरी शहर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे अधिकारी पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने नव्या संचालक मंडळाने जिल्हा मच्छिमार सहकारी संघ रत्नागिरीचा आता अधिकृत ताबा घेतला आहे. सदर ताबा घेतल्यानंतर नूतन संचालक मंडळाची संघाच्या पेठ किल्ला येथील कार्यलयात सभा घेण्यात आली.

टाईम्स स्पेशल

त्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष हरेश्वर कालेकर आणि उपाध्यक्ष केशव नारायण वाघे यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी नूतन संचालक सदस्य राजेंद्र चोगले यांनी प्रास्ताविक केले. संघाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक बावा भालेकर यांनी मनोगत व्यक्त करून नूतन संचालक मंडळाला मार्गदर्शन केले. यावेळी संचालक विष्णू तबीब यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध मच्छी व्यवसायिक आबूभाई आणि माजी नगरसेवक मयेकर यांनी देखील सभेला मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती मर्राबी भाटकर यांनी सर्वाचे आभार मानले. शेवटी अध्यक्षाच्या परवानगीने सभा संपविण्यात आली. तीन वर्षांच्या प्रशासकीय आणि न्यायिक लढ्याला मिळालेले हे यश जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांसाठी केवळ प्रशासकीय निर्णय नसून, लोकशाही, सहकार आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा क्षण मानला जात आहे. अनधिकृतपणे संस्थेवर दावा कायम ठेवण्याच्या प्रयत्नांना अखेर पूर्णविराम मिळाल्याची भावना मच्छिमार समाजातून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg