loader
Breaking News
Breaking News
Foto

आभाळच फाटलं ! मेढे तर्फे संगमेश्वर गावात दोन दिवसांच्या पावसाने हिरावला १०० हून अधिक एकर शेतीचा घास; अनेक शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

संगमेश्वर /वार्ताहर : "चार महिने चिखलात पाय रोवून, रक्ताचं पाणी करून आम्ही आमच्या पोराबाळांसाठी वर्षाची रसद गोळा करत होतो... पण त्या दोन दिवसांच्या पावसाने आमच्या नशिबाचा पोशंदाच हिरावून घेतला. आता पुढचे बारा महिने पोरांना काय खायला घालू आणि कसं जगू?" हा काळीज पिळवटून टाकणारा टाहो आहे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागातील मेढे तर्फे संगमेश्वर गावातील हवालदील शेतकऱ्यांचा. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार आणि रौद्र पावसामुळे स्थानिक नदीला आलेल्या वेगवान प्रवाहाने संपूर्ण गावावरच मोठा आघात केला आहे. या प्रवाहाने चक्क आपली वहिवाट बदलून थेट गावातील पिकाऊ शेतांचा ताबा घेतला आहे. नदी आता थेट शेतांमधून वाहू लागली आहे, ज्यामुळे एका दुसऱ्या शेतकऱ्याचे नव्हे, तर गावातील अनेक शेतकऱ्यांची सुमारे १०० पेक्षा अधिक एकर शेतजमीन पूर्णपणे बाधित झाली आहे. या अथांग क्षेत्रातील पेरण्या तर वाहून गेल्याच आहेत, पण तिथे आता पुन्हा कधीही शेती करता येणार नाही, या भीतीने अनेक शेतकरी कुटुंबांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मेढे तर्फे संगमेश्वर गावातील बहुतांश गरीब कुटुंबांचे आयुष्य केवळ आणि केवळ या काळ्या आईच्या भरवशावर चालते. पावसाळ्याचे हे चार महिने म्हणजे या शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या जगण्याची शिदोरी असते. रात्रंदिवस घाम गाळून, अंगाचे पाणी करून हे शेतकरी तांदळाचा दाणा-दाणा गोळा करतात, जेणेकरून वर्षभर कुटुंबाची चूल पेटती राहील. यंदाही मान्सूनच्या सुरुवातीला गावकऱ्यांनी कर्ज काढून, पदरमोड करून मोठ्या आशेने पेरण्या केल्या होत्या. मात्र, जूनचा पंधरावडा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. कुटुंब कसे जगवायचे, या चिंतेत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. जूनच्या शेवटी पाऊस आला, चेहऱ्यावर हसू उमलले, पण हे हसू त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे वादळ घेऊन येईल, अशी पुसटशी कल्पनाही या निष्पाप शेतकऱ्यांना नव्हती.गेल्या दोन दिवसांत निसर्गाने असे काही रौद्र रूप धारण केले की, धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अक्राळविक्राळ बनला. या जोरात आलेल्या पाण्याच्या प्रचंड दाबाने नदीचा मार्गच बदलला आणि हा प्रवाह थेट हिरव्यागार शेतांमध्ये घुसला. अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या पोरासारखी जपलेली रोपे तर वाहून गेलीच, पण पाण्याच्या प्रवाहाने १०० हून अधिक एकर शेतातील सुपीक मातीचा कण अन् कण खरवडून नेला. संपूर्ण विस्तीर्ण शेतजमीन क्षेत्र बाधित झाले असून तिथे आता नदीचे पात्र स्थिरावले आहे. ज्या जमिनीच्या तुकड्यांवर अनेक कुटुंबांचे भविष्य, पोरांचे शिक्षण आणि म्हाताऱ्या मायबापाचे औषधपाणी अवलंबून होते, ती हक्काची जमीनच डोळ्यांदेखत पाषाण झाली आहे. भविष्यात तिथे कधीही शेती करता येणार नाही, ही जाणीव होताच कित्येक वृद्ध शेतकऱ्यांचे हात थरथरले आणि त्यांनी शेताच्या बांधावरच डोक्याला हात लावून टाहो फोडला.

टाइम्स स्पेशल

​या अस्मानी सुलतानी संकटाची आणि शेतकऱ्यांच्या हुंदक्यांची माहिती मिळताच कोंडये गावचे सरपंच तथा शिवसेना कसबा गट विभाग प्रमुख महेश देसाई यांनी तातडीने मेढे तर्फे संगमेश्वर गावातील बाधित शेकडो एकर शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि उद्ध्वस्त झालेली शेती पाहून देसाई यांचेही मन हेलावले. त्यांनी हवालदील झालेल्या सर्व गरीब शेतकरी कुटुंबांना भावनिक धीर दिला.हे नुकसान केवळ पिकांचे नाही, तर अनेक कुटुंबांच्या संपूर्ण वर्षाच्या जगण्याच्या आधाराचे आहे. चार महिने घाम गाळून वर्षाची रसद गोळा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची सुमारे १०० हून अधिक एकर जमीन अशी बाधित होणे हे अत्यंत क्लेशदायक आणि भयानक आहे. पाऊस ओसरल्यानंतर नदीचा हा प्रवाह पूर्ववत कसा करता येईल आणि ही जमीन पुन्हा कशी वाचवता येईल, यासाठी प्रशासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. या संदर्भात मी स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तातडीने धाव घेणार असून, शासनाकडून या सर्व कुटुंबांना भरीव आर्थिक मदत आणि कायमस्वरूपी उपाययोजना मिळवून देण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन," अशी अत्यंत भावनिक ग्वाही महेश देसाई यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg