loader
Breaking News
Breaking News
Foto

दै. रत्नागिरी टाइम्समधील बातमीची होर्डिंग्ज सार्‍या देवगड तालुक्यात गावोगावी झळकली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) कोकणात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून संभ्रम असतानाच, या प्रकल्पासाठी अद्याप कोणतीही जागा निश्चित नसल्याचा महत्त्वपूर्ण खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. या वास्तवावर प्रकाश टाकणार्‍या ’रत्नागिरी टाइम्स’मधील सविस्तर बातमीचा आधार घेत देवगडमध्ये ठिकठिकाणी मोठे बॅनर झळकवण्यात आले असून वातावरण तापले आहे.संपूर्ण कोकणात यावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने विधानसभा सदस्य ज्योती गायकवाड, अमिन पटेल, अस्लम शेख, संजय मेश्राम आणि रामदास मसराम यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. २५ मे २०२६ रोजी केंद्र व राज्य शासनामार्फत रत्नागिरीतील पूर्णगड व मेर्वी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारसू आणि देवगड येथे नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का? असा सवाल त्यांनी विचारला होता. या प्रस्तावित प्रकल्पामुळे कोकणातील आंबा-काजू बागायती, भातशेती आणि मच्छिमारी व्यवसाय उद्ध्वस्त होऊन पर्यावरणावर व रोजगारावर गंभीर परिणाम होणार असल्याने स्थानिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे का, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदारांच्या या प्रश्नांना लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात शासनाची भूमिका स्पष्ट केली. राज्यात अणुऊर्जा वीज प्रकल्प स्थापन करण्याबाबत राज्य शासन स्तरावर अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या उद्योग समूहांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत, अशी अधिकृत माहिती शासनाने सभागृहात दिली. मात्र, राज्यामध्ये अणू वीज प्रकल्पासाठी कोणतीही जागा किंवा स्थळ अंतिमरित्या निश्चित करण्यात आलेले नाही, असा मोठा आणि खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील पूर्णगड, मेर्वी, बारसू किंवा सिंधुदुर्गातील देवगड यापैकी नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहील, याबाबत शासनाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आणि विनाशकारी प्रकल्पाच्या संभाव्य आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावरही शासनाने वस्तुस्थिती मांडली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांकडून आंदोलनाबाबतचे कोणतेही अधिकृत निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आंदोलनाशी संबंधित उर्वरित प्रश्नांचे मुद्दे उद्भवत नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

प्रकल्पाची जागा निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेतील खुलासा आणि त्या अनुषंगाने ’रत्नागिरी टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचे बॅनर आता अज्ञात व्यक्तींकडून देवगड तालुक्यात लावले जात आहेत. प्रस्तावित अणुऊर्जा समर्थकांकडून हे बॅनर्स लावले जात असल्याचा आरोप करत, आंदोलनकर्त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे.सुरुवातीला कंपन्यांसोबत करार झाले, आंदोलक कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे कीं,तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामार्फत प्रस्तावित जागेची घोषणा करण्यात आली होती; त्यानंतरच मुणगे व हिंदळे ग्रामस्थांनी मोठे आंदोलन पुकारले होते. आता या आंदोलनांची धार बोथट करण्यासाठीच ’अजून जागा निश्चिती झालेली नाही’ अशी माहिती दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या संभ्रमाच्या वातावरणात, ’देवगडमध्ये प्रकल्प होणार नाही’ अशी थेट घोषणाच मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी आक्रमक मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg