loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे येथे मरी आईच्या गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : हर्णे येथे मांडण्यात आलेल्या मरी आईच्या गोंधळात अगदी लहान थोर अबाल वृध्द महिला पुरुषांनी हाती पेटत्या दिवट्या घेऊन फेर धरून आपला आनंद साजरा केला. आपल्याकडे आजही पूर्वी प्रचलित असलेल्या रूढी परंपरा या काळातही पारंपारिक पद्धतीने तशाच जपल्या जात आहेत. अशीच एक पारंपरिक पद्धत दापोली तालुक्यातील हर्णे गावची आहे. दर तीन वर्षांनी आषाढ महिन्यात मरी आई देवस्थानच्या ठिकाणी श्रध्देने मरीआईचा गोंधळ मांडला जातो. ही वर्षोनुवर्षाची गोंधळ मांडण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा परंपरा त्याच भक्तिभावाच्या भावनेने आजही तशीच सुरू आहे. त्या भक्तीभावाच्या श्रध्देचे मोल इतक्या वर्षानंतरही तसूभरही कमी झालेले नाही हेच खरे तर हर्णे पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या एकतेचे यश म्हणावे लागेल. दापोली तालुक्यातील हर्णे गावाला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हर्णे गाव हे एकेकाळी तालुक्याचे ठिकाण होते. अशा या गावात विविध धर्माचे अठरा पगड जातीचे लोक आजही अगदी गुण्यागोविंदाने राहतात. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. अशा या गावात पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, गोवा किल्ला, फत्तेगड आदी किल्यांचा गावाला गड किल्लांचा इतिहास आहे. हर्णे बंदर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. त्यामुळे मासेमारीच्या काळात सकाळ आणि संध्याकाळ असे दोनदा मासळीचा लिलाव होतो. आणि त्यामुळे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर म्हणून हर्णे बंदर ओळखले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मासेमारी व्यवसायामुळे हर्णे गावाचे विस्तारिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही खुपच वाढत चालली आहे, अशा या ठिकाणी ओघानेच विविध प्रकारच्या आस्थापनांची मोठ्या प्रमाणात दुकांनेही थाटलेली आहेत. त्यामुळे गावाबाहेरुन रोजगार व्यवसायासाठी आलेल्यांची संख्याही वाढतच चालली आहे. असे असले तरी येथील मुळ रहिवाशांच्या सण उत्सव साजरे करण्याच्या प्रथा परंपरा कार्यक्रमांना अजिबातच बगल देण्यात आलेली नाही. त्यामुळे हर्णे गावातील पूर्वी सुरू असलेल्या वर्षोनुवर्षीच्या सण उत्सव कार्यक्रम साजरा करण्याच्या प्रथा तशाच सुरू आहेत हे गावातील लोकांचे खरे सामुदायिक यश आहे. हर्णे गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांना एक आगळेवेगळे महत्त्व आहे. अशीच एक हर्णे पंचक्रोशीतील गावाची परंपरा म्हणजे मरी आईच्या गोंधळाचा कार्यक्रम होय. साथींच्या रोगावरती आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यापूर्वी मरिआईची पूजा केली जात असे. आजही ग्रामीण भागामध्ये मरिआईची जत्रा धार्मिक आणि सांस्कृतिकष्ट्या महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी गावाच्या वेशीवरती मरिआईचं मंदिर देखील असतं ते गावाच्या रक्षणाचं प्रतीक मानलं जातं. मरिआई देवी या महाराष्ट्रातल्या लोकप्रिय ग्रामदैवतांपैकी एक आहे. मरिआई देवीला परंपरेत अत्यंत मानाचे स्थान आहे. ग्रामीण भागात मरिआई ही गावाचे रक्षण करणारी, रोगराईपासून संरक्षण करणारी आणि संकटांचे निवारण करणारी शक्तीस्वरूप माता मानली जाते.

टाईम्स स्पेशल

लोकश्रद्धेनुसार देवी, कांजण्या, कॉलरा आणि इतर साथीच्या रोगांपासून गावाचे संरक्षण करण्यासाठी त्याकाळी मरिआई देवीची पूजा केली जात असे. आजही हे मरी आईचे श्रध्देय स्थान येथील लोकांना पुजनीय आहे. त्यामुळे दर तीन वर्षांनी आषाढ महिन्यात हर्णे येथे मरीआईचा गोंधळ मांडला जातो.तसा हर्णे पंचक्रोशीतील लोकांकडून हर्णे येथे गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाच्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या गोंधळाच्या कार्यक्रमात मोठ्या भक्तिभावाने अगदी लहान थोर अबालवृद्ध महीला पुरुष सहभागी झाले होते हर्णे पंचक्रोशीतील गावांसह तालुक्यातीलही मोठ्या संख्येने लोक येथे खास मरी आईच्या गोंधळाला आणि प्रसादासाठी आलेले होते. यातील बहुतेकांनी श्रध्देने दिवट्या नाचवत मन शांतीचा आनंद घेतला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा महामारी आली त्यावेळी व्दीपद चतु:पद प्राण्यांचे रक्षण करा या मुळ उद्देशाने मरी आईचा अनेक ठिकाणच्या गावकऱ्यांकडून रक्षणासाठी धावा करण्यात आला. तशाच प्रकारे हर्णे येथेही धावा करण्यात आला असावा आणि तेथून कदाचित देवासाठी गोंधळ मांडण्याची प्रथा सुरू झाली असावी, कारण आपल्या येथे उत्सव आणि परंपरेला एक वारसा लाभला आहे. या युगातही सण उत्सावाच्या श्रद्धेचे तसुभरही मोल कमी झालेले नाही. त्यामुळे अशा परंपरा सुरूच आहेत आणि त्यातून आनंद मिळतो. त्यामुळे त्या टिकून आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg