loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी रत्नागिरीत भव्य मोर्चा; ‘शाळा बंद’ ठेवत धरणे आंदोलन!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी आज, ९ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी शहरात भव्य मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून हजारो शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केला. माळनाका येथून निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या आंदोलनादरम्यान "BLO आणि TET परीक्षा रद्द करा!" आणि "शिक्षकांवरील अ-शैक्षणिक कामे रद्द करा!" अशा जोरदार घोषणा देत शिक्षकांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. ​शिक्षक समन्वय समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. आंदोलक शिक्षकांनी हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रामुख्याने खालील मागण्यांवर शिक्षक ठाम होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​TET परीक्षेची अनिवार्यता रद्द करण्यात यावी. BLO (मतदार नोंदणी) सारखी सक्तीची अ-शैक्षणिक कामे त्वरित रद्द करावीत, जेणेकरून शिक्षकांना पूर्ण वेळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येईल. ​पदोन्नतीमधील अन्यायकारक अटी रद्द कराव्यात. ​संचमान्यतेचे चुकीचे धोरण बदलण्यात यावे. ​जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन ​माळनाका येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिक्षकांनी शांततापूर्ण मार्गाने पण ठामपणे निदर्शने केली. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, उर्दू शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना यांसह जिल्ह्यातील तब्बल १६ प्रमुख सहयोगी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता.

टाईम्स स्पेशल

आंदोलनाच्या शेवटी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक संतोष गु. पावणे, अध्यक्ष दिलीप ग. देवळेकर आणि इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. राज्य शासनाने ३० जून रोजी दिलेल्या नोटीसीची दखल न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या वेळी शिक्षक नेत्यांनी दिला. ​या आंदोलनामुळे आज जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या या आंदोलनाला सुप्त पाठिंबा दर्शविल्याचे चित्र पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg