loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरेश ठाकूर यांच्या 'शब्दांच्या पलीकडले' पुस्तकाचे ब्रेल लिपीतील प्रकाशन संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - आचरे येथील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर लिखित मराठी शब्दांचा शोध आणि बोध घेणाऱ्या "शब्दांच्या पलीकडले" या पुस्तकाचे ब्रेल लिपीतील प्रकाशन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी येथे माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या विद्यालयाच्या संचालिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी या पुस्तकाचे ब्रेल लिपीमध्ये रूपांतर केले आहे. पुस्तक प्रकाशन समारंभात शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून व नंतर दिलीपकुमार मराठे यांनी लिहिलेले 'हा वारसा मराठीचा' हे गीत गाऊन कार्यक्रमाचा प्रारंभ केला. याला संगीत साथ सुद्धा दृष्टीहीन मुलांचीच होती. शिक्षक दिलीपकुमार मराठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पुस्तकाचा परिचय करून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रामचंद्र आंगणे म्हणाले, प्रतिभा सेनगुप्ता यांनी आज या पुस्तकाचे अंतरंग महाराष्ट्रातील दृष्टीहीन वाचकांपर्यंत पोहोचविले आहेत. मराठीतील दर्जेदार ग्रंथ निवडून त्यांचे ब्रेल रूपांतर करून अंध बांधवांना ते ज्ञान देण्याचे पवित्र कार्य त्यांच्याकडून झालेले आहे. सुरेश ठाकूर यांचे पुस्तक खऱ्या अर्थाने शब्दांच्या पलीकडे गेलेले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांनी शुभेच्छा देत शब्दांच्या पलीकडले हे पुस्तक आता खऱ्या अर्थाने सर्वांना उपलब्ध होत आहे, असे सांगत पुस्तकाचे लेखक ठाकूर यांचा गौरव केला. प्रतिभा सेनगुप्ता म्हणाल्या, दृष्टीहीन मुलांना साहित्याचा आनंद उपलब्ध करून देण्याचा निश्चय करून आपण हे पुस्तक ब्रेल लिपीमध्ये तयार करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. देवनागरी लिपीतील १११ शब्दांच्या कुळ आणि मूळ कथांचे ब्रेल लिपी मध्ये आठ खंड आज प्रकाशित झाले, असेही त्या म्हणाल्या. सेवानिवृत्त बँक बँक अधिकारी चंद्रशेखर धानजी यांनी आलेल्या संदेशांचे वाचन केले. प्रशालेच्या विद्यार्थिनी पूजा व चैत्राली यांनी पुस्तकाच्या काही भागाचे वाचन केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमास मामा पोटफोडे, विजय जोशी, सचिन सेठ, सचिन माळी, फणसेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी उत्तमकुमार जैन, प्रतिभा वागळे, देव्हारे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र रेवाळे, घराडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. फुले, शांताराम पवार, सुनील आईनकर, नितीन लंबे, मनेष व्याघरांबरे, मंडल अधिकारी दिनेश गोडघासे, विद्यालयाचे शिक्षक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमकुमार जैन यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg