loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्र. १५ मध्ये ७ कोटीचे अद्ययावत शॉपिंग सेंटर साकारले जाणार

रत्नागिरी: रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणार्‍या एका मोठ्या विकासकामाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५ मधील आरक्षण क्रमांक ५८ च्या जागेवर आता एक भव्य आणि अद्ययावत शॉपिंग सेंटर साकारले जाणार आहे. स्थानिक नागरिकांची आणि व्यापार्‍यांची गरज ओळखून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा ढेकणे यांच्या अथक परिश्रमांना आणि विशेष पाठपुराव्याला यात मोठे यश आले आहे. त्यांनी या निधीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे आग्रही विनंती केली होती. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी तत्परतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या निधीची शिफारस केली, ज्याला मंजुरी मिळाल्याने आता हा भव्य निधी रत्नागिरीला प्राप्त झाला असून अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत हा निधी थेट रत्नागिरी नगरपरिषदेला बहाल केला आहे. या प्रकल्पाचा पूर्ण १०० टक्के खर्च राज्य शासन स्वतः करणार असून, यामुळे रत्नागिरीतील स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. या नव्या शॉपिंग सेंटरमुळे शहरातील व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी हक्काची आणि हवेशीर जागा उपलब्ध होईल, शिवाय नागरिकांनाही एकाच छताखाली खरेदीचा एक उत्तम, सोयीस्कर आणि आधुनिक अनुभव घेता येईल. वर्षा ढेकणे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभागातील आणि शहरातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. दरम्यान, हा निधी मंजूर करताना कामात पूर्ण पारदर्शकता आणि दर्जा राखण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी रत्नागिरी नगरपरिषदेवर सोपवण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

प्रकल्पांतर्गत होणारी सर्व कामे ही पूर्णपणे ई-निविदा पद्धतीचा अवलंब करूनच केली जावीत, जेणेकरून कामात कोणतीही अनियमितता राहणार नाही, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच, शॉपिंग सेंटर उभारण्यापूर्वी त्या जागेचे आधीचे फोटो काढून ठेवणे आणि कामाचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करून घेणे नगरपरिषदेला बंधनकारक करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची आणि निधीचा योग्य विनियोग होत असल्याची खातरजमा करण्याची महत्त्वाची जबाबदारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. शॉपिंग सेंटरचे काम सार्वजनिक जागेवरच व्हावे आणि ते विकास आराखड्याशी सुसंगत असावे, अशा कडक अटी शासनाने घातल्या आहेत. ढेकणे यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या मोठ्या आर्थिक पाठबळामुळे रत्नागिरीत लवकरच एक देखणे शॉपिंग सेंटर उभे राहणार असून, रत्नागिरीकर या नव्या सुविधेसाठी कमालीचे उत्सुक आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg