loader
Breaking News
Breaking News
Foto

नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करु - उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

वैभववाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रसिंह कुशवाह, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी जि.प.अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, सिंधुदुर्गच्या नाधवडे येथील सुमारे ११.१४ हेक्टर एमआयडीसीची जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन महामंडळाच्या ताब्यात असून संबंधित शेतकर्‍यांना मोबदल्याचे वितरण पूर्ण झाले असून सातबारा नोंदीही एमआयडीसीच्या नावावर झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन २०२२-२३ मध्ये तयार करण्यात आलेला पायाभूत सुविधांचा अंदाजपत्रक आता कालबाह्य झाल्यामुळे त्याचा तातडीने फेरआढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रक तयार करावे आणि मंजुरीसाठी त्वरित सादर करावे. सुमारे १५ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना विलंब न लावता प्रारंभ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. याकामी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून वास्तववादी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश मंत्री डॉ.सामंत यांनी दिले. तसेच नाधवडे येथे प्रस्तावित ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रासाठी आवश्यक ४० गुंठे जमीन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याचेही मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगत असून प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग तसेच विद्यमान रेल्वे स्थानकाच्या निकट असल्याने या परिसराला उत्कृष्ट रस्ते व रेल्वे संपर्काचा लाभ मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे भविष्यात हे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यांनी व्यक्त केला. त्यामुळे अल्पावधीत अधिक उद्योग उभे राहतील, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योग विकासाला गती मिळेल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. त्याचवेळी परिसरातील पाण्याच्या उगमस्थानाचे संरक्षण होईल, पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनीही पर्यावरणीय बाबींची पूर्ण दक्षता घेत औद्योगिक विकास करण्यात येईल, असे सांगितले. मंत्री डॉ. सामंत यांनी प्रारंभी या औद्योगिक क्षेत्रामध्ये एमएसएमई उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील टप्प्यात मोठ्या उद्योगांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg