loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई येथे ‘मिशन ग्रीन गोल्ड’ अभियानाचा शुभारंभ

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील दी एज्युकेशन सोसायटी, कडवई व उमलती पृथ्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ग्रीन गोल्ड’ अर्थात कडवई बांबू लागवड अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, बांबू लागवडीचा प्रसार आणि रोजगारनिर्मिती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी तझीन कापडी यांनी प्रास्ताविकातून ‘मिशन ग्रीन गोल्ड’ या संकल्पनेची माहिती दिली.या कार्यक्रमात डॉ. अश्विनी नारकर यांनी वाढती वृक्षतोड ही पर्यावरणासाठी गंभीर समस्या असून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच बांबूच्या पानांचे औषधी गुणधर्म स्पष्ट करत, कफ व तापावर त्यांचा उपयोग होत असल्याची माहिती दिली. कडवईचे पोलिस पाटील संजय ओकटे यांनी संतांच्या अभंगांचा दाखला देत वृक्ष हे आपले पाहुणे असून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत प्रशासक दत्ताराम ओकटे यांनी शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबर पर्यावरण जनजागृती करणारे उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक करून पुढील सहकार्याची ग्वाही दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख पाहुणे माजी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी "मी झाड लावणार, मी झाड जगवणार" हा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोकणातील पडीत जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासोबत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती साधता येईल, तसेच कडवईला ‘बांबू गाव’ बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष सादिक काझी यांनी संकटात संधी शोधण्याची गरज व्यक्त करत, कोकणातील पडीत जमिनीवर बांबू लागवड केल्यास पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. भूतान हा जगातील कार्बन निगेटिव्ह देश असल्याचे उदाहरण देत त्यांनी वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच वस्त्रोद्योगासह विविध क्षेत्रांत बांबूचा वाढता वापर लक्षात घेता त्याच्या व्यावसायिक शक्यता मोठ्या असल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक तथा कासारकोळवणचे पोलिस पाटील महेंद्र करंबेळे यांनी बांबूचे विविध प्रकार, लागवडीची पद्धत, आवश्यक काळजी आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः लागवड केलेल्या १८०० बांबू बेटांचा अनुभव सांगत माणगा, ग्रीन वल्गारिस, ऑलिव्हेरी, कुल्डा, कळक, मेस व चिवा या जातींची माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

यावेळी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बांबू रोप देऊन स्वागत करण्यात आले. माजी उप गट विकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे,जमात-ए- मुस्लिमीन कडवईचे अध्यक्ष सिकंदर जुवळे, महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक रिदवान कारीगर, मुश्ताक सावंत, सुबोध कल्याणा, संदेश फडकले, अफसर खान, नौशाद मोडक, मुजीब डावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित मोहिते यांनी केले, तर आभार दी कडवई इंग्लिश स्कूल, कडवईचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात बांबू रोपांची लागवड करून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg