loader
Breaking News
Breaking News
Foto

"Run for Health"च्या घोषवाक्याखाली वर्षा मॅरेथॉनचे दुसरे पर्व; २६ जुलै रोजी खेडमध्ये भव्य आयोजन

खेड | प्रतिनिधी : निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने "Run for Health" या घोषवाक्याखाली लायन्स क्लब ऑफ खेडतर्फे वर्षा मॅरेथॉन २०२६ चे दुसरे पर्व रविवार, २६ जुलै २०२६ रोजी खेड येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने नियमित व्यायामाची सवय लावून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेची माहिती देताना क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून गेली १६ वर्षे खेड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. विशेषतः गेल्या पाच वर्षांत क्लबने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले आहे.यावर्षी नूतन अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली क्लबची नव्या जोमाने वाटचाल सुरू झाली असून, पदग्रहणानंतर अवघ्या ११ दिवसांत तब्बल २३ सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृद्धाश्रम व विशेष मुलांच्या संस्थांना सहकार्य, आरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्रतपासणी, मधुमेह तपासणी, वृक्षारोपण तसेच गरजू रुग्णांना व्हीलचेअर, वॉकर आणि हॉस्पिटल बेडसारखे वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याचे कार्य क्लब सातत्याने करत आहे.

टाइम्स स्पेशल

"जिथे कमी, तिथे आम्ही" आणि "निराधाराला आधार" या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे हेच लायन्स क्लबचे ध्येय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. तब्बल १,६७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत खेडसह सातारा, सावंतवाडी, चिपळूण, दापोली, माणगाव, महाड आदी भागांतील धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यंदाची वर्षा मॅरेथॉन अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत असून, रविवार, २६ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन "Run for Health" या अभियानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेडचे नूतन अध्यक्ष अविनाश दळवी, पंकज शहा, राजेश जोईसर, रोहन विचारे, शमशुद्दीन भाई मुकादम, सुरेश चिकणे, शैलेश धारिया यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg