loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील शेतीला नवी दिशा; सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

दाभोळ (स्वप्नील घटे) : कोकणातील शेती आज अनेक आव्हानांना सामोरी जात आहे. शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुणांचे शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. परिणामी अनेक ठिकाणी शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे कठीण होत असून काही शेतीक्षेत्रे पडिक राहण्याचीही वेळ येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सामूहिक शेतीचा अवलंब करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कमी मनुष्यबळातही अधिक कार्यक्षम आणि उत्पादनक्षम शेती करणे शक्य होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच उद्देशाने पाणी फौंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धेअंतर्गत दिनांक ११ जुलै २०२६ रोजी मौजे आघारी येथे सहभागी झालेल्या श्री सिद्धिविनायक शेतकरी गटाच्या सामूहिक शेती प्रक्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात पिकाची लागवड करण्यात आली. भात लागवडीतील ही आधुनिक आणि शास्त्रशुद्ध पद्धत कमी मजुरांमध्ये, कमी खर्चात आणि अधिक उत्पादन मिळवून देणारी असल्याने ती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. तसेच या पद्धतीमुळे रोपांची योग्य वाढ, तणांचे प्रभावी व्यवस्थापन, खतांचा कार्यक्षम वापर आणि पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे सुलभ होते. यावेळी उप कृषी अधिकारी, दाभोळ डी. एच. जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचे महत्त्व, योग्य लागवड तंत्र, रोपांचे अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बदलत्या परिस्थितीत शेती अधिक किफायतशीर आणि शाश्वत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमात श्री सिद्धिविनायक शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक शेतीची ताकद प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. परस्पर सहकार्य, सामूहिक नियोजन आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील शेती अधिक सक्षम करण्याचा हा एक आदर्श उपक्रम ठरत आहे. कोकणातील बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत शेतीसमोरील मजूरटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब हा काळाची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण होण्याबरोबरच अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg