loader
Breaking News
Breaking News
Foto

राजकारणापलीकडे कला जपणारा गणेशमूर्तीकार गुरुदास गवंडे

बांदा (प्रतिनिधी) - गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून जिल्हाभरातील गणेशमूर्तीकारांकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील निगुडे येथील गणेशमूर्तीकार गुरुदास गवंडे हेही पारंपरिक कला जपत इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या मूर्तींना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे मूर्तिकार गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधनाचे दर वाढले असून त्याचा थेट परिणाम माती, रंग, वाहतूक, वीज, तसेच मजुरीच्या खर्चावर झाला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, मूर्तिकारांना अपेक्षित आर्थिक आधार मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुदास गवंडे यांनी सांगितले की, कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. प्रत्येक घरात ज्या गणपती बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते, त्या मूर्ती घडविणार्‍या पारंपरिक कलाकारांनाही शासनाने योग्य सन्मान व आर्थिक पाठबळ द्यावे. गोवा सरकार स्थानिक गणेशमूर्तीकारांना प्रति फूट गणेशमूर्तीमागे सुमारे २०० अनुदान देते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकारांना अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग गणेशमूर्तिकार संघाच्या वतीने गाईच्या शेणापासून व लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात गोव्यातील मूर्तिकारांनीही सहभाग घेतला होता. त्या कलाकारांच्या कार्याची दखल घेत गोवा सरकारने त्यांचा सत्कार केला. याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही सिंधुदुर्गातील गणेशमूर्तीकारांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

गुरुदास गवंडे यांनी सांगितले की, त्यांनी १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देऊन गणेशमूर्ती व्यवसायासाठी अनुदान, आर्थिक सहाय्य आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी सिंधुरत्न योजनेतून काही गणेशमूर्तीकारांना साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळाले होते. यावर्षीही त्याचप्रमाणे मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माती, रंग, वाहतूक, जागेचे भाडे, वीज आणि इतर साहित्याच्या वाढत्या खर्चामुळे मातीच्या गणेशमूर्ती व्यवसायास मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणातील दशावतार कलेप्रमाणेच गणेशमूर्ती घडविणार्‍या कलाकारांच्या अडचणीही शासनाने समजून घ्याव्यात, त्यांच्या कलेचे जतन व्हावे आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, अशी मागणी गणेशमूर्तीकार गुरुदास गवंडे यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg