loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटेतील सांडपाणी प्रकरणी प्रदुषण मंडळावर ग्रामस्थांचा मोर्चा

चिपळूण (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात रासायनिक सांडपाणी बाहेर टाकण्याच्या आरोपानंतर परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. सोनगावसह परिसरातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) चिपळूण कार्यालयावर मोर्चा काढत संबंधित उद्योगांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि प्रदूषणाचा तपास अहवाल जाहीर करावा. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ७ जुलै रोजी सीईटीपीमधील सी-संप तुंबल्याने रासायनिक मिश्रित पाणी बाहेर पडून ते शेती, नाले आणि खाडीत गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले असून पिवळसर रासायनिक पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंदोलकांनी सांगितले की, सीईटीपीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने संबंधित उद्योगांना सांडपाणी सीईटीपीमध्ये न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या आदेशांचे उल्लंघन करून काही उद्योगांनी सांडपाणी सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर एमपीसीबी आणि एमआयडीसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ७२ तास उलटूनही पाणी व मातीच्या नमुन्यांचा तपास अहवाल जाहीर न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सहा कंपन्यांना नोटिसा बजावल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कारखाने सुरूच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. एमपीसीबी कार्यालयात अधिकार्‍यांची अनुपस्थिती, काही अधिकार्‍यांनी फोन न उचलणे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगपतींच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, माजी खासदार हुसैन दलवाई यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री तसेच पर्यावरण मंत्र्यांना निवेदन पाठवून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. रासायनिक सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची, शेतीचे मोठे नुकसान होण्याची आणि स्थानिक पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg