loader
Breaking News
Breaking News
Foto

ई-कार्ट पार्सल’ आणि ’गव्हर्नमेंट चार्जेस’च्या नावाखाली रत्नागिरीतील महिलेची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी - इन्स्टाग्रामवर आकर्षक जाहिरात पाहून सुंदर ड्रेस ऑर्डर करणे रत्नागिरीतील एका महिलेला भलतेच महाग पडले आहे. अवघ्या १००० रुपयांच्या खरेदीच्या नादात ’ई-कार्ट पार्सल’ आणि विविध शासकीय शुल्काच्या नावाखाली या महिलेची तब्बल १० लाख ३१ हजार २०९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजोळे पाडावेवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथे राहणार्‍या सई प्रथमेश बांडावे (वय ३७ वर्षे) यांनी ४ फेब्रुवारी २०२६ ते १८ जून २०२६ या कालावधीत इन्स्टाग्रामवर कपड्यांची एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीत दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क साधून त्यांनी एक ड्रेस ऑर्डर केला आणि त्याचे १००० रुपये क्यूआर कोड स्कॅन करून गुगलपे द्वारे ऑनलाईन भरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पैसे भरल्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी महिला सई बांडावे यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपण ’ई-कार्ट’ कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून, तुमचे पार्सल आले असल्याचे भासविले. मात्र, हे पार्सल मिळवण्यासाठी गव्हर्नमेंट चार्जेस आणि इतर प्रक्रिया शुल्क भरावे लागेल, अशी बतावणी त्याने केली. पार्सल अडकल्याची भीती आणि आरोपीच्या बोलण्याला बळी पडून फिर्यादी महिला समोरून सांगण्यात येईल त्या बँक खात्यांवर पैसे पाठवत गेली. आरोपीने वेगवेगळ्या कारणांखाली आजतागायत तब्बल १०,३१,२०९/- रुपये ऑनलाईन उकळले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सई बांडावे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी ३ जुलै २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (खढ अलीं) २००० चे कलम ६६(ड) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी जाहिरातींवर किंवा पार्सल सोडवण्यासाठी शासकीय शुल्काची मागणी करणार्‍या ऑनलाईन कॉल्सवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही अनोळखी खात्यावर पैसे पाठवण्यापूर्वी शहानिशा करावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg