loader
Breaking News
Breaking News
Foto

पेण हादरले! पाच वर्षीय चिमुकलीची हत्या; संशयित जेरबंद

पेण (विशेष प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासीवाडी येथे पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पेण तालुक्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी एका २४ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेण पोलीस ठाण्याला मंगळवारी (१४ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास पाटणेश्वर आदिवासी वाडी येथील पाच वर्षीय मुलगी रिया ही सोमवार १३ जुलै रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पेण पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांच्या विशेष शोध पथकासह श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. परिसरातील शेत, झाडी आणि आसपासच्या भागात कसून शोध घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शोधमोहीमेदरम्यान घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील शेत परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने परिसराचा ताबा घेऊन पंचनामा केला आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरविली. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तसेच पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित किरण भिकू वाघमारे (वय २४) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यामागील नेमके कारण, तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मृत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पेण तालुका हादरला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg