loader
Breaking News
Breaking News
Foto

वणौशी येथे स्कुलबस चिखलात रुतली; फसलेल्या स्कुलबसला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले यश

दापोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने दापोली मंडणगड मार्ग सुधारणा करण्याचे काम जवळपास गेल्या दिड वर्षापासून सुरू आहे. असे हे रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने बेजबाबदार पद्धतीने रस्ता खणुन ठेवल्याने अनेक ठिकाणी माती चिखल राडारोडा तयार झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. अशा या मार्गावर दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू या महसुली गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस वणौशीत रस्त्यातील चिखलात अडकली. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या आणि चिखलात फसलेल्या स्कुल बसला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने धक्का देऊन बाहेर काढण्यात आले असले तरी अशा प्रकारची घटना पुढे घडणारच नाही, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सध्या हा मार्ग सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी धोक्याचा झाला. त्यामुळे या मार्गावरुन नेहमी प्रवास करणारे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या हलगर्जीपणाच्या कारभाराचा संताप व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातून मंडणगड मार्गे पुढे पूणे, मुंबई, ठाणे शहरांकडे जाणारा असा दापोली मंडणगड मार्ग हा महत्त्वाचा असा मार्ग आहे. अशा या मार्गावर अहोरात्र मोठी रहदारी असते. दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, प्रवासी वाहतूक तसेच मालवाहू वाहने यांची सतत वर्दळ सुरू असते. असा हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे धोक्याचा झाला आहे. मात्र तरीसुद्धा कोणत्याही उपाययोजना या रस्त्यावर ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या नाहीत. वा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची दखल घ्यावी, असे वाटत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद आहे ? अशा चर्चा आता सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

कारण आज विद्यार्थ्यांची स्कुल बस रस्त्यातील चिखलात फसली विद्यार्थ्यांची बस म्हणून आणि दिवसा घडलेली घटना म्हणून स्थानिक मदतीसाठी धावले. उद्या पर्यटकांची किंवा प्रवासाठी आलेल्यांवर रात्रीच्यावेळी असा प्रसंग उद्भवला तर कोण मदतीला धावणार हा खरा प्रश्न आहे. कारण येथे नेटवर्क सुध्दा धड नाही मग रात्रीच्या अंधारात चिखल तुडवत जाणार का ? त्यात महिला असेल तर विचारच करायला नको त्यामुळे संबंधित बांधकाम ठेकेदार आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी घेऊन मार्ग वाहतुकयोग्य करावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg