loader
Breaking News
Breaking News
Foto

सावित्री नदीवरील आंबेत–महाड पुलाला धडक; बार्ज मालकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

खेड (दिलीप देवळेकर) - सावित्री नदीवरील आंबेत–महाड पुलाला बार्ज धडकल्याप्रकरणी तब्बल अकरा दिवसांनी बार्ज मालकाविरुद्ध माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पुलाचे नुकसान होऊन सरकारी मालमत्तेची हानी झाली होती. तसेच पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा तसेच सावित्री नदीला पूर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. असे असतानाही बार्ज मालक रशाद अहमद मुजावर (रा. बांद्रा पश्चिम, मुंबई) यांनी सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना न करता तीन बार्ज नदीत नांगरून ठेवले होते. तसेच बार्ज बांधण्यासाठी वापरण्यात आलेले दोर आणि नांगराची योग्य देखभालही करण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अतिवृष्टीमुळे ६ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात बार्जचे दोर तुटले आणि नांगर वाहून गेला. यामुळे एम.व्ही. अल सुभानी (MV AL SUBHAANI), एम.व्ही. दुलदुल (MV DULDUL VI) आणि एम.व्ही. झोया (MV ZOYA) हे तीन बार्ज नियंत्रणाबाहेर गेले. यापैकी एम.व्ही. अल सुभानी हा बार्ज महाड–आंबेत पुलाखालून वाहत जाऊन खाडीकिनारी अडकला, तर एम.व्ही. दुलदुल आणि एम.व्ही. झोया या दोन बार्जनी पहाटे साडेचारच्या सुमारास आंबेत–महाड पुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत पुलाच्या संरचनेचे नुकसान झाले असून सरकारी मालमत्तेची हानी झाली. तसेच पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, माणगाव उपविभागातील कनिष्ठ अभियंता ओंकार अशोक शिरगांवकर (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. बार्ज मालक रशाद अहमद मुजावर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३२४(५), २८९ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg