loader
Breaking News
Breaking News
Foto

​वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा

सावंतवाडी, (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेतीची दयनीय अवस्था आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कृषी दिनाच्या कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार केल्यानंतर, अध्यक्ष कामत यांनी जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी किसान संघाला विशेष निमंत्रित केले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली. ​गेली तीन वर्षे भारतीय किसान संघ जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या त्रासाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी आणि अभ्यासू तोडगा काढण्यासाठी वन विभाग, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग अशा सर्व संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची एकत्र बैठक लावून नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षांनी यावेळी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी सोलार कुंपण आणि अत्याधुनिक सोलार ध्वनिक्षेपक (साऊंड सिस्टम) पुरवणे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. ​यावेळी भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हा परिषदेकडे खालील प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अन्नसुरक्षा कायदा २०१३ च्या तरतुदींनुसार वानर, माकड, शेकरू, गवारेडा, सांबर, हत्ती, मोर आणि साळिंदर या प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा. सामूहिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटींशिवाय १००% अनुदानावर सोलार कुंपण व काटेरी तार कुंपण देण्यात यावे. देशी गाईला राज्यमातेचा दर्जा मिळाल्यामुळे, देशी गोवंश संवर्धनासाठी 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर गोपालक शेतकऱ्यांना किमान १ ते कमाल ५ गाईंसाठी प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्यात यावे.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५७ गावांपैकी ४२१ गावांचे नकाशे अजूनही ऑनलाइन अपलोड झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून हे नकाशे तातडीने अपलोड करावेत. या विषयात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले. मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरी आणि गोठ्यांची देयके (बिल्स) तातडीने अदा करावीत. निधी मंजूर असूनही देयके न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, तरी या कामांना गती द्यावी. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची रिक्त पदे विशेष बाब म्हणून तातडीने भरण्यात यावीत. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भारतीय किसान संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कुंभार, जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद पंत वालावलकर, महिला आयाम प्रमुख स्वाती पिंगुळकर आणि वेंगुर्ला तालुका अध्यक्ष युवराज ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg