loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले तरीबंदरावर भीषण आग; दोन बोटी खाक... तब्बल ६५ लाखांचे नुकसान!

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे दोन मच्छिमार बोटींना भीषण आग लागून तब्बल ६५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये या आगीत दोन्ही बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वर्षांच्या कष्टातून उभ्या केलेल्या दोन मच्छिमारांच्या संसाराचे आधारस्तंभ अक्षरशः जळून खाक झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिकदृष्ट्या हा मोठा आघात मानला जात आहे. यामध्ये जगन्नाथ पोशिराम पावसे राहणार मल्लखांब पेठ, हर्णे., यांची मच्छिमार नौका 'तेजस्विनी' नोंदणी क्रमांक -IND-MH-4-MM-4594 & 28/02/2019 या नौकेचे जळून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, दुसरी प्रवीण यशवंत रघुवीर (वय ५५ ) रा. जेटीबाग, हर्णे. यांची 'पौर्णिमा' नावाची नौका देखील जळून खाक झाली आहे. तिचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद पोलीस पंचनाम्या मध्ये करण्यात आली आहे. या दोन्ही नौकांमधील मच्छिमार जाळी, नौका शाकारून ठेवलेले प्लास्टिक आणि इतर साहित्य यांचे एकंदरीत ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान काल सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेबाबत परिसरात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत. या घटनेने दापोली तालुक्यातील मच्छिमार बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाखो रुपयांच्या बोटी, महागडी यंत्रसामग्री, जाळी अशा साहित्याने भरलेल्या बंदरांवर अग्निसुरक्षेची पुरेशी व्यवस्था आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. समुद्रात जीव धोक्यात घालून मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कितपत सक्षम आहे, याचेही आत्मपरीक्षण आता आवश्यक ठरले आहे. या दुर्घटनेनंतर दापोली तालुक्यात साधा अग्निशमन बंबही उपलब्ध नसल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. आग लागल्यानंतर तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा असती, तर नुकसानाची तीव्रता कमी झाली असती अशी भावना स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांकडून व्यक्त केली जात आहे. पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि किनारपट्टीच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना मूलभूत अग्निसुरक्षा सुविधा मात्र अद्याप अपुऱ्या असल्याची भावना व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी प्रवीण यशवंत रघुवीर यांनी दिलेल्या खबरीवरून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पंचनामा व तपासानंतरच जळीतामागील कारण समोर येणार आहे. दरम्यान, या आगीत सुमारे ६५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शासन या मच्छिमारांना कोणती मदत आणि भरपाई देणार, याकडे आता सर्व मच्छिमार बांधवांचे लक्ष लागले आहे. नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच अशा दुर्घटनांमध्येही शासनाने तातडीने पंचनामे करून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या बोटींवर अवलंबून असल्याने ही केवळ मालमत्तेची हानी नसून अनेक कुटुंबांच्या भविष्यावर आलेले संकट असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर तरी दापोली तालुक्यासाठी कायमस्वरूपी अग्निशमन सुविधा, बंदरांवर आधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा आणि मच्छिमारांसाठी प्रभावी विमा व नुकसानभरपाईची व्यवस्था उभारली जाईल का, हा प्रश्न आता अनुत्तरित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg