loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथील कोकण कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार जाहीर

दापोली(प्रतिनिधी)- दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘कृषि आणि संबंधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला, सन २०२५/२६ या वर्षासाठी देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद आयसीएआर अंतर्गत कार्यरत असलेल्या या संशोधन केंद्राने संशोधन, तंत्रज्ञान विकास, शेतकरी हिताची उपकरणे निर्मिती, प्रशिक्षण आणि विस्तार कार्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन, कृषी क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संशोधन केंद्राचे प्रकल्प अन्वेषक ‘प्रा. डॉ. विजय आवारे’ यांनी वार्षिक कार्यशाळेदरम्यान केंद्राच्या संशोधन कार्याचे, विकसित तंत्रज्ञानाचे तसेच शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अधिकार्‍यांकडून विशेष दाद मिळाली. प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुखबीर सिंग यांनी ई-मेलव्दारे विदयापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे अभिनंदन करत केंद्राच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि उत्कृष्ट कामगिरीच्या कार्याचे समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन २००९ पासून कार्यरत असलेले हे संशोधन केंद्र कृषि व संबंधित क्षेत्रातील श्रमविज्ञान, सुरक्षितता आणि महिलांसह शेतमजुरांचे श्रम कमी करणारी, आधुनिक साधने विकसित करण्यासाठी काम करत आहे. शेतीतील कामगारांची कार्यक्षमता वाढविणे, शारिरीक ताण कमी करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि सुरक्षित कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. संशोधन केंद्रात विकसीत केलेल्या मनुष्यचलीत तसेच बॅटरीचलीत ’कोकण प्रसन्ना’, भात लावणी यंत्र, नाचणी मळणी-सडणी यंत्र, या सारख्या अनेक नाविन्यपूर्ण उपकरणांचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानापैकी अनेकांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून डिझाईन रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे. विकसीत केलेली यंत्रे विक्री तसेच भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली असून, प्रशिक्षण शिबिरांच्या प्रात्यक्षिकांसह कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा प्रसार करण्यात येत आहे. केंद्राने संशोधनासोबतच शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि कृषि उद्योजक, यांच्यासाठी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करुन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान गावागावात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकर्‍यांना होत आहे.

टाइम्स स्पेशल

अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘कृषी आणि संबधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला सन २०२५/२६ या वर्षासाठी देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार जाहीर झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ बोलताना प्रकल्प अन्वेषक प्रा. डॉ. विजय आवारे यांनी कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक, संचालक, विस्तार शिक्षण, संचालक शिक्षण, सहयोगी अधिष्ठाता, संबंधित विभागप्रमुख, वैज्ञानिक, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ प्रशासनाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन प्रोत्साहन, सहकार्य त्याचप्रमाणे सांघिक प्रयत्न यामुळेच हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg