loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरासह तालुक्यात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; मोठे नुकसान

लांजा (संजय साळवी) - सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत लांजा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोठेही जीवितहानी झालेली नाही. यामध्ये मंगळवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील लांजा - साटवली मार्गावर भटवाडी येथे भले मोठे आकेशियाचे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. मंगळवारी सकाळी पावसाने उसंत घेतली होती. मात्र सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे लांजा - साटवली मार्गावर भटवाडी येथे भले मोठे आकेशियाचे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने एस.टी. बससह अन्य वाहने अडकून पडली होती. ही माहिती मिळताच लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक योगेश कावतकर, नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये, नगरसेविका निधी गुरव आदी घटनास्थळी दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर तसेच नगरसेवक योगेश कावतकर यांनी बांधकाम विभागाशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यात पडलेले झाड बाजूला करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. स्थानिक नागरिक मंगेश आंबेकर यांनी देखील याबाबतची माहिती बांधकाम विभागाला दिली होती. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील तेलीवाडी येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज वाहिनीवर झाड पडल्याने ४ विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे लांजा शहर पूर्व बाजारपेठ, आडाचा मार्ग, उपशेट्येवाडी, बेलवलकर शॉपिंग, मारीगोल्ड बिल्डिंग, तेलीवाडी, वैभव वसाहत, कुंभारवाडी, नामदेव नगर या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. कोर्ले फिडरवरून या भागाला विद्युत पुरवठा होत असल्याने आसगे, बेनीखुर्द, वाडगाव, खेरवसे, विवली, केळंबे, आडवली, हसोळ या गावांतील देखील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच तालुक्यातील हर्चे राणेवाडी येथील रस्ता खचून रस्त्याला भेग गेल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

त्याचबरोबर सोमवारी ६ जुलै रोजी सकाळी तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथील अविनाश रामदास मांडवकर यांच्या उभ्या असलेल्या कारवर वडाचे झाड कोसळून कारचे नुकसान झाले आहे. तसेच सोमवारी तालुक्यातील व्हेळ-पाचल रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत रस्त्यात पडलेले झाड तात्काळ बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. तसेच सोमवारी तालुक्यातील पन्हळे कुडकरवाडी येथील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. तसेच तालुक्यातील चाफेट शिंदेवाडी येथील मंगला गुण्ये यांच्या घरावर फणसाच्या झाडाची फांदी पडल्याने पडवीवरील सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg