loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचलच्या तेजस जाधवचा एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तिसरा क्रमांक; गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव

राजापूर (प्रतिनिधी) - जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू कान्हा ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै. चांगू कान्हा ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, १३ जुलै रोजी पनवेल येथील चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालयात दुपारी ४ वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल गावचा सुपुत्र तेजस तुषार जाधव (पाचलकर) याचा विशेष सन्मान करण्यात आला. तेजसने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती योजना (NMMS Examination 2025-26) मध्ये शाळेत तिसरा क्रमांक तर जिल्ह्यात ३२ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुभाष बोरसे, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, नगरसेविका राजेश्री वावेकर, पर्यवेक्षक हरिश्चंद्र ठाकूर, अजित सोनवणे, स्वाती पाटील, मुख्याध्यापक कैलास म्हात्रे, प्रभारी मुख्याध्यापिका स्वाती काळे, प्रशांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

तेजसने शैक्षणिक वाटचाल करताना इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण पनवेल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊननंतर तो आपल्या मूळ गावी पाचल येथे आला. येथे त्याने काही काळ जिल्हा परिषद आदर्श शाळा, पाचल (बौद्धवाडी) येथे शिक्षण घेतले. पुढे इयत्ता पाचवी व सहावीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे पूर्ण केले. इयत्ता सातवीपासून त्याने पुन्हा पनवेल येथील चांगू कान्हा ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवली. सध्या तेजस इयत्ता नववीच्या 'अ' तुकडीत शिक्षण घेत असून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा आणि विविध उपक्रमांमध्येही तो सक्रिय सहभाग घेत आहे. अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी होऊन जिल्हाधिकारी (कलेक्टर) बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. आपल्या गावाचे, जिल्ह्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg