loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.मांडकी खुर्द शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान, ना. उदय सामंत यांनी शिक्षक वर्गासह विद्यार्थी व ग्रामस्थांचा केला सन्मान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) आणि आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२०२५ व (२०२५-२६) च्या दिमाखदार वितरण सोहळ्यात चिपळूण तालुक्यातील मांडकी खुर्द शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. हा कार्यक्रम रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयूरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी या शाळेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' टप्पा 1 मध्ये तालु़कास्तरीय प्रथम क्रमांक आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक हे देखील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता तिसऱ्या पुरस्काराची देखील आणखी भर पडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना विचारे तसेच पदवीधर शिक्षक दत्तात्रय नार्वेकर, सहशिक्षिका विद्या कसबेकर, सहशिक्षक रविंद्र घाणेकर यांनी अतिशय मेहनत घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या सहकार्याने शाळेत विविध उपक्रम राबवून या शाळेला आदर्श शाळा म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आता जिल्हा परिषदेतर्फे मांडकी खुर्द मराठी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित केले गेल्याने शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच पालक वर्गाच्या मेहनतीला यश मिळाले आहे. या पुरस्काराने शाळेचे तसेच गावाचे देखील नाव उंचावले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टाईम्स स्पेशल

ही शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील एक आदर्श शाळा आहे.यापूर्वी शाळेला सानेगुरुजी स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार तसेच रत्नागिरी डायट तर्फे आनंददायी शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील पहिली इंटरॲक्टिव्ह डिजीटल शाळा आहे. डेरवण युथ गेम्स मध्ये शाळा दरवर्षी सहभागी होते. राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत सलग 10 वर्षे विजेतेपद या शाळेने पटकावले आहे. या शाळेने तब्बल १२ लाखांचा शैक्षणिक उठाव केला आहे. शाळेच्या प्रगतीत शाळा व्यवस्थापन समिती मांडकी खुर्द अध्यक्ष निलेश डिके, श्रीराम घाणेकर, संजय मादगे, सोनू मादगे, संजय धुमक, सचिन खांबे, संतोष गुडेकर, तानाजी गुडेकर, प्रकाश घाणेकर, सुभाष डिके, सोनू धुमक, नितीन मादगे व सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका मीना विचारे, पदवीधर शिक्षक दत्तात्रय नार्वेकर, उपशिक्षिका विद्या कसबेकर, उपशिक्षक रविंद्र घाणेकर यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख विजय कवितके, शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई यांचे मार्गदर्शन तसेच गटशिक्षणाधिकारी इरनक यांच्या प्रेरणेमुळे शाळा यशाचे शिखर गाठू शकली. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मांडकी खुर्द सर्वांची ऋणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg