loader
Breaking News
Breaking News
Foto

आत्महत्येचा प्रयत्न करणारा निघाला फरार आरोपी; महिलेचा मृत्यू, लहान मुलासह आरोपी जखमी

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शुक्रवारी (३ जुलै) सायंकाळी मेटे परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अंजनी बौद्धवाडी येथील शुभ्रा अतिश दिवेकर (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर खेड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आणि दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी सचिन सत्यवान जुवळे व त्याच्यासोबत असलेले एक लहान मूल जखमी झाले. दोघांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शुभ्रा दिवेकर, सचिन जुवळे आणि एक लहान मूल हे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत होते. मेटे परिसरात तिघांनी चालत्या रेल्वेतून उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत शुभ्रा दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन जुवळे गंभीर जखमी झाला. लहान मुलालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोतवलीचे पोलीस पाटील श्रीकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे मेटे परिसरात थांबली. त्यावेळी रेल्वेतून एक महिला, एक लहान मुलगा आणि सचिन जुवळे यांनी उड्या मारल्याची माहिती मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळी पोहोचल्यावर महिला जागीच मृतावस्थेत होती, लहान मुलगा शुद्धीत होता, तर सचिन जुवळे बेशुद्ध अवस्थेत पडला होता. रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमींना खेड येथे हलविले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन जुवळे हा खेड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी असून दोन गुन्ह्यांमध्ये फरार होता. १२ मे २०२६ रोजी त्याने स्वतःचे राहते घर पेटवून दिल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर १६ मे रोजी लोटे-आवाशी येथे त्याची दुचाकी आढळून आली होती. ती खेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती. जून महिन्यात तो चिपळूण परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक पथकाने शोधमोहीम राबविली; मात्र तो वालोपे परिसरातील डोंगर भागात पळून गेल्याचे सांगण्यात आले. या घटनेतील मृत शुभ्रा दिवेकर या सचिन जुवळे यांच्या सख्ख्या पत्नी नसून त्यांच्या आत्येभावाच्या पत्नी असल्याची माहिती पोलीस पाटील श्रीकांत जाधव यांनी दिली. संबंधित नातेवाईकाच्या निधनानंतर त्या सचिन जुवळे यांच्यासोबत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सचिन जुवळे यांची पहिली पत्नी आणि मुले ही त्यांच्या आई-वडिलांकडे राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

घटनास्थळी किंवा जखमी सचिन जुवळे यांच्या खिशात उंदीर मारण्याचे औषध तसेच आत्महत्येचा उल्लेख असलेली सुसाइड नोट सापडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत शुभ्रा दिवेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून जखमी सचिन जुवळे व लहान मुलावर उपचार सुरू आहेत. या आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे ज्या मेटे परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणापासून सचिन जुवळे यांचे गाव अवघ्या काही अंतरावर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिघे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत असले, तरी ते नेमके कोणत्या रेल्वे स्थानकावरून रेल्वेत चढले होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेमागील कारण, त्यांचा प्रवास आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील उद्देश याचा सर्व बाजूंनी खेड पोलीस सखोल तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg