loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे येथील वरिष्ठ महाविद्यालयाची इमारत धोकादायक; तातडीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी, आंदोलनाचा इशारा

खेड(प्रतिनिधी):- भरणे येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या तुकाराम बाबुराव कदम वरिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा परिषद सदस्य सचिन विश्राम धाडवे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी १५ जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले असून, वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयाच्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील स्लॅब मध्यभागी वाकलेल्या अवस्थेत असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी संस्थेकडून भिंतीलगत बीम बसवून तसेच लोखंडी पाईपच्या आधारावर स्लॅबला तात्पुरता सपोर्ट देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, अशा प्रकारच्या उपाययोजना कायमस्वरूपी सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसल्याने इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महाविद्यालयात दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा धाडवे यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

याशिवाय, इमारतीची धोकादायक अवस्था माहिती असतानाही त्याच ठिकाणी शैक्षणिक कामकाज सुरू ठेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा आरोप करत संबंधित संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सचिन विश्राम धाडवे यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg