loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नगिरी नगरपरिषदेला शहराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनाचे वैशिष्टपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान, १४ कोटी ३० लाखांचा भरीव निधी मंजूर

रत्नागिरी: रत्नागिरी शहराच्या शिरपेचात विकासाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेला तब्बल १४ कोटी ३० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय नगर विकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी जारी केला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत तसेच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा अत्यंत महत्त्वाचा निधी रत्नागिरी शहरासाठी आणण्यात यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील पूल आणि नाला विकसित करण्यासाठी शासनाने ५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यापाठोपाठ आता पुन्हा १४ कोटी ३० लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर झाल्याने रत्नागिरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या नव्या निधीमुळे शहरातील विकासकामांचा वेग आता कमालीचा वाढणार आहे. शासनाने जारी केलेल्या अधिकृत विवरणपत्रानुसार, या १४ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीतून शहरातील चार अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील विविध विकासकामांसाठी ४ कोटी ८० लाख रुपये खर्च केले जातील. तसेच प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील शाळांच्या इमारतींचे रखडलेले किंवा नवे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल ७ कोटी रुपयांची सर्वात मोठी तरतूद करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय, शहरातील पानवल भागातील पाणी वितरण व्यवस्थेचे काम सक्षम करण्यासाठी ७५ लाख रुपये आणि स्थानिक नाट्यगृहाच्या अग्निशामक यंत्रणेसह इतर अनुषंगिक कामांसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प १०० टक्के राज्य शासनाच्या अर्थसहाय्यातून साकारला जाणार असून, जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहेत. या विकासकामांच्या मंजुरीमुळे शहरातील शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत होतीलच, शिवाय पाणीपुरवठा आणि प्रशासकीय सेवांचा दर्जाही उंचावणार आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी दाखवलेल्या या कटिबद्धतेबद्दल नागरिकांमधून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg