loader
Breaking News
Breaking News
Foto

धक्कादायक ! राम मंदिरातून चोरलेल्या पैशातून सुरू केला ‘व्याजी धंदा’, शेअरबाजारातही गुंतवणूक

अयोध्या, - अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीनंतर सार्‍या देशात खळबळ उडालेली असतानाच अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींच्या चौकशीतून रोज काहीना काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संघटित गुन्हेगारी टोळीला देखील लाजवेल अशा पद्धतीने या आरोपींनी ही चोरी केल्याचे समोर येते आहे. आरोपींनी मंदिराच्या दानपेटीतून नेमकी किती रक्क्म चोरली याचा आकडा अजूनही पुढे आलेला नाही. शेकडोकोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असताना काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. चोरलेल्या पैशातून एका आरोपीने व्याजी धंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे. त्यासोबतच आरोपीने मोठी रक्कम शेअर बाजारांमध्ये गुंतवल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्यासंबंधित नातेवाईकांची मिळून एकूण ३० बँक खाती गोठवली आहेत. तपासादरम्यान या चोरीच्या सुरस कथा समोर येवू लागल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेला मंदिर संस्थेचा कर्मचारी अनुकल्प मिश्रा याने चोरलेल्या पैशांपैकी काही मोठी रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरी जावून नातेवाईक आणि काही लोकांची या संदर्भात चौकशी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी या प्रकरणात अनुकल्प मिश्रा याची आणि त्याच्या काही नातेवाईकांची बँक खाती गोठवली आहेत. एकूण ३० जणांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पैशातून अनुकल्प मिश्राने मालमत्ता तर खरेदी केलीच. त्याचजोडीला त्याने सावकारीही सुरू केली होती. तो लोकांना पैसे व्याजाने द्यायचा. काही पैसे त्याने नातेवाईकांना दिल्याचे सांगितले. जे प्रत्यक्षात त्याने काहीजणांना व्याजाने कर्ज म्हणून दिले होते. दामदुप्पट व्याज आकारून अनुकल्प हा बेकायदेशीरपणे व्याजी धंदा करायचा असे पोलीस तपासात पुढे आल्याचे सांगण्यात आले. अनुकल्पने चोरलेल्या पैशांपैकी एक मोठी रक्कम शेअर बाजारात गुंतवली होती. या प्रकरणात त्याचे काही नातेवाईक त्याला मदत करत होते. त्यांच्या खात्यावर काही पैसे त्याने वळविले होते. अशी एकूण ३० संशयास्पद व्यवहार झालेली खाती निदर्शनास आली असून त्या खात्यांमधील व्यवहार त्याच्या अधिकृत उत्पन्नाशी विसंगत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने ही ३० बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. याच जोडीला अनुकल्पने अयोध्या आणि आसपासच्या परिसरात मालमत्ता खरेदी केली असून जेमतेम १५ ते २० हजार रुपये पगार असलेल्या या माणसाने लाखो रुपयांची मालमत्ता कशी खरेदी केली याचा तपास सुरू आहे. त्याच्या आणि नातेवाईकांच्या व्यवहारांची कसून पडताळणी केली जात आहे. रोख रक्कमेचे व्यवहार तपासले जात आहेत. राम मंदिरातील चोरीचा तपास करणार्‍या पोलिसांच्या पथकाने अनुकल्पच्या घरामध्ये जावून झडती घेतली. कुटूंबियांचीदेखील चौकशी केली. फारेंसिक तज्ञ आणि पंचांच्या उपस्थितीत कागदपत्रे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी, बँक व्यवहार, खाजगी व्यवहाराच्या चिठ्‌ठ्या (पावत्या) आदी सर्व पुरावे तपासण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या झडतीदरम्यान अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ज्ञासाच्या बनावट पावत्याही पोलिसांना सापडल्या आहेत. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बनावट पुस्तके छापल्याची कबूली आरोपींनी तपासात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान तपास अधिकार्‍यांच्यामते आरोपींनी मंदिरातील दान केलेल्या वस्तू आणि पैशांच्या मोजणी प्रक्रियेमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेतला. संशंय येवून नये म्हणून दानपेटीतील रक्कम थोड्याथोड्या प्रमाणात मंदिरातून बाहेर काढून जात होते. ती रक्कम लगेच खर्च न करता काही ठिकाणी गुंतविण्यात आल्याची माहिती आहे. ज्यातून अनुकल्पने ‘सावकारी’ करत काहींना व्याजाने पैसे दिले. काही रक्कम जमिन खरेदीसाठी वापरली असे तपासात पुढे येते आहे. याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. केवळ चोरीला गेलेली रक्कम परत मिळविण्यापुरता तपास करण्यात येत नसून आरोपींनी संघटित टोळीसारखी किंबहूना त्यांनाही लाजवेल अशा पद्धतीने कार्यपद्धती अवलंबली असून त्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न आहे.या चोरीतील रक्कमेचे लाभार्थी कोणकोण आहेत? याचाही शोध घेतला जात आहे. तपासात आरोपींकडून ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचे पुढे येत असून त्या अनुषंगाने सार्‍या व्यवहारांची चौकशी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg