loader
Breaking News
Breaking News
Foto

तापमानवाढीने आंबा पिकाला पहिल्याच टप्प्यात धोका

संगलट (खेड)(प्रतिनिधी) - दापोली तालुक्यात हवामानाचा सूर अचानक बदलला असून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. बुधवारी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर दुपाचे तापमान तब्बल ३३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दिवसाच्या वेळी जाणवणारा उकाडा आणि रात्री गारव्याचा लवलेशही नसल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. साधारण १५ नोव्हेंबरच्या सुमारास थंंडी ही समाधानकारक होती. मात्र, काही दिवसांत तापमान वाढत गेले आणि डिसेंबरच्या उंबरठ्यावरही थंड हवा जाणवू लागलेली नाही. या अनियमित हवामानाचा सर्वाधिक परिणाम आंबा हाडांच्या वाढीच्या नैसर्गिकचक्रावर होत आहे. झाडांच्या विश्रांतीची अवस्था थंडीमुळे पूर्ण होते, त्यानंतरच झाड मोहरासाठी तयार होते. परंतु योग्य प्रमाणात थंडी न मिळाल्यास मोहर उशिरा येणे आणि झाडांची वाढ फळधारणेपेक्षा वाढीकडे झुकणे अशी स्थिती निर्माण होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृषी जाणकारांच्या मते, हवामानातील हा कल कायम राहिल्यास मोहर आणि फुलधारणेत २० ते ३० टक्क्यापर्यंत घट होण्याची दाट शक्यता आहे. फळांची संख्या व आकार कमी होतोच, शिवाय दर्जा, चव, साखर प्रमाण आणि रंग यावरही परिणाम दिसून येतो. यामुळे बाजारात दर कडाडले तरी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती कमी उत्पत्र येण्याची परिस्थिती निर्माण होते. दापोली तालुक्यात सुमारे ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड आहे. कोकणच्या अभिमानाचा मान असलेल्या दापोली हापूसचे या वर्षी उत्पादन व दर्जा यावर तापमानवाढीचे सावट दाटले असून, बागायतदारांसह ग्राहकांमध्येही काळजीचे वातावरण आहे. हवामानातील या बदलाने हवामानबदलाची गंभीर चाहूलही अधोरेखित केली आहे. एकेकाळी समुद्रकिनार्‍यावरील थंड हवेसाठी ओळख असलेल्या दापोलीत गेल्या काही वर्षांत थंडीचा कालावधी कमी होत चालला आहे. उन्हाचा दाह वाढला असून ऋतूंच्या हालचाली विस्कळीत होत आहेत. हा पिकांसाठी धोक्याचा इशाराच आहे. कृषी विभाग आणि तज्ञांनी अनावश्यक पाणी व खतांचा वापर टाळण्याचा, बाग स्वच्छ ठेवत कीड-रोग नियंत्रणावर भर देण्याचा, तसेच हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती गंभीर राहिल्यास तज्ज्ञ मार्गदर्शनानुसार उपाययोजना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg