loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडयेत बिबट्याशी झुंजणाऱ्या त्या निष्पाप वानराची प्राणज्योत मालवली; फौजी जवानासह ग्रामस्थ उपचारासाठी धावले, लाल वस्त्रात लपेटून अश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप

संगमेश्वर / वहाब दळवी : संगमेश्वर ​कोंडये देऊळवाडी येथे बुधवारी रात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्याच्या जबड्यातून वानराची सुटका करणाऱ्या त्या शूर फौजी जवानाने आणि ग्रामस्थांनी गुरुवारीही मानवतेचा एक अनोखा वस्तुपाठ घालून दिला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या निष्पाप वानराची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. गुरुवारी दुपारी ते वानर निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर, त्याला वाचवण्यासाठी त्या सैनिकाने आणि गावकऱ्यांनी उपचाराची शर्थ केली; मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. अखेर त्या निष्पाप वानराचा करुण अंत झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवारी दुपारी कोंडये देऊळवाडी येथील माजी सरपंच सुरेश दसम हे नेहमीप्रमाणे परिसरातून जात असताना, त्यांना काल रात्री ज्या खोपटीवर हल्ला झाला होता, त्याच परिसराजवळ ते वानर निपचित पडलेले दिसून आले. वानर अजूनही जिवंत असावे आणि त्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या आशेने माजी सरपंच सुरेश दसम आणि काल रात्री बिबट्याला पळवून लावणारे भारतीय सैन्यातील जवान सुभाष येसणे यांनी कसलाही विलंब न करता तात्काळ गावातील तरुणांना सोबत घेतले.​बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या मुक्या प्राण्याला वेदनेतून मुक्त करण्यासाठी आणि त्याच्या जखमांवर औषधोपचार करण्याच्या दृष्टीने जवान सुभाष येसणे, माजी सरपंच सुरेश दसम आणि कोंडये देऊळवाडी येथील तरुण स्वतः पुढे सरसावले. तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावण्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती.मात्र, जेव्हा जवान येसणे, सुरेश दसम आणि ते तरुण त्या वानराजवळ पोहोचले, तेव्हा डॉक्टरांचे उपचार मिळण्यापूर्वीच त्या मुक्या जीवाची प्राणज्योत मालवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बिबट्याचे तीक्ष्ण सुळे आणि पंजे शरीरात खोलवर रुतल्यामुळे झालेल्या अतिरक्तस्रावाने आणि गंभीर दुखापतींमुळे या वानराचा आधीच अंत झाला होता. ​*"रानटी प्राणी असला तरी त्यालाही वेदना अन् जीव असतोच!"- ​वानर मृत झाल्याचे समजताच परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त झाली. "रानटी प्राणी असला तरी तोही एक जीव आहे, मुका प्राणी असला म्हणून काय झाले, त्यालाही आपल्यासारख्याच वेदना होतात," अशी अत्यंत संवेदनशील आणि भावूक प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटली. प्राण्यांप्रती दाखवलेल्या या अथांग दयेने आणि मानवी संवेदनेने सर्वांचेच मन हेलावून टाकले.या मुक्या प्राण्याबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी आणि भावुकतेतून, माजी सरपंच सुरेश दसम यांनी त्या मृत वानराला सन्मानाने दफन करण्याचे ठरवले. त्यांनी आणि जवान सुभाष येसणे यांनी त्या मृत वानराला अत्यंत प्रेमाने एका लाल कपड्यात लपेटले.

टाइम्स स्पेशल

​-गावकऱ्यांनी खोदला खड्डा; सैनिकाच्या हाताने सन्मानपूर्वक दफन* ​सुरेश दसम यांच्या निर्णयानंतर निलेश मुंडेकर, संतोष दसम, सागर शितप, मधुकर दसम आणि सुभाष बाल्ये यांनी पुढे होत तात्काळ खड्डा खोदला. त्यानंतर देशाचे रक्षण करणाऱ्या त्याच फौजी जवानाने स्वतःच्या हाताने त्या वानराला अत्यंत भावपूर्ण वातावरणात दफन केले. काल रात्री बिबट्याशी दोन हात करून जीवदान देणारा सैनिकच आज त्या प्राण्याला लाल कपड्यात लपेटून निरोप देत असल्याचे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.काल रात्री बिबट्याच्या हल्ल्यातून सुटल्यानंतर हे वानर उपचाराने जगेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण कोंडये देऊळवाडीत हळहळ आणि दुःखाचे सावट पसरले.​एका बाजूला या निष्पाप प्राण्याच्या मृत्यूचे दुःख आणि दुसरीकडे मानवी वस्तीत छतावर चढून थेट शिकार करणाऱ्या हिंस्त्र बिबट्याची दहशत यामुळे कोंडये देऊळवाडी व मधली वाडी येथील नागरिक प्रचंड घाबरलेले आहेत. वन विभागाने आता तरी या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन या हिंस्त्र बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

हीच खरी मानवता आणि पुण्यकार्य

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg