loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री सामंत यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे शिक्षणासोबतच आरोग्य आणि सांस्कृतिक विकासाचे पर्व सुरु

रत्नागिरी : आरोग्य सेवेचा कायापालट, भव्य मराठी भाषा संग्रहालय आणि विकासाच्या अनेकविध योजनांनी रत्नागिरी जिल्ह्याला नवा चेहरा मिळाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या या धडाकेबाज निर्णयामुळे कोकणात शिक्षणासोबतच आरोग्य आणि सांस्कृतिक विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रत्नागिरीत ६९३ कोटी रुपयांच्या निधीतून जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सीच्या (जायका) माध्यमातून भव्य वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभी राहणार असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे. या महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेसह बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. जीएनएम आणि एएनएमपेक्षा हा अत्यंत आधुनिक आणि पदवी स्तरावरील कोर्स असून, येथील विद्यार्थी थेट मेडिकल कॉलेजमध्ये सेवा देणार आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडीची वाढलेली संख्या आणि तिथल्या उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांवर ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास दृढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांत तिथे हजारो मेजर आणि मायनर सर्जरी यशस्वी पार पडल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हिमोफिलियाच्या उपचारांसाठी ५० लाख, ऑर्थोपेडिक उपकरणांसाठी २० लाख आणि अत्याधुनिक ऑक्सिजन यंत्रणेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला वॉर्डमध्ये पुरुषांच्या अनधिकृत वावरावर कडक प्रतिबंध घालण्यासाठी एसओपी (प्रमाणित कार्यप्रणाली) तयार करण्यात आली असून, आता रुग्णांच्या नातेवाईकांच्या कडक नियमांनुसारच प्रवेश दिला जाईल. दंत विभागालाही उत्तम प्रतिसाद मिळत असून, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे गतीशील झाली आहे. दुसरीकडे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या ’ज्ञानेश्वरी’ पासून ते आजवरच्या साहित्यिकांच्या समृद्ध ठेव्याचे जतन करण्यासाठी रत्नागिरीतील सन्मित्र नगर येथे २५ कोटी रुपयांच्या खर्चातून भव्य ’मराठी भाषा संग्रहालय’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. बाळशास्त्री जांभेकर, पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या दिग्गज साहित्यिकांची व महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या विभूतींची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत हे संग्रहालय होणार आहे. यात होलोग्राफी, फोटोग्राफी आणि संशोधनाची सुविधा उपलब्ध असेल.

टाईम्स स्पेशल

याशिवाय पालघरमध्ये पुस्तकांचे गाव आणि एस. एम. जोशींचे स्मारक उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांचा आढावा घेताना, सिंधू रत्न योजनेअंतर्गत मेडिटेशन सेंटर, नगरपालिकेची नवीन इमारत आणि टिळक शाळेचे एक वर्षात होणारे काम यावर भर देण्यात आला. टिळक शाळेच्या इमारतीत केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला असून, स्मशानभूमींचे आधुनिकीकरण आणि विविध रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात रत्नागिरीने उत्तम कामगिरी केली असून, महिला सक्षमीकरणासाठी ’ई-रिक्षा’ वित २५ टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे रत्नागिरीचा सर्वांगीण विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg