loader
Breaking News
Breaking News
Foto

खाणकामाला पर्याय; मांदिवलीत बांबू शेतीच्या माध्यमातून हरित विकासाची सुरुवात

दापोली (यशवंत कांबळे) -मांदिवली गावातील सावंतवाडी येथील शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारत बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. गावात आणि तालुक्यात रोजगाराच्या मर्यादित संधी असताना खाणकामासारख्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा बांबू शेती हा अधिक शाश्वत आणि दीर्घकालीन पर्याय असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी भावेश कारेकर आणि मयुरेश जालगावकर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. पुढील काळात मांदिवली परिसरात टप्प्याटप्प्याने ५०० एकरांवर बांबू लागवड करण्याचे नियोजन असून, त्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. यासाठी ५० एकर क्षेत्रात लागवड होणारी ७,५०० बांबूची रोपे विनय कोलते यांच्या भोर नर्सरीमधून मांदिवली येथे आणण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी गावात बांबू शेतीविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर कृषी अधिकारी (AO) श्वेता शिंदे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) क्रांती माने यांनी मंडणगड तालुक्यातील वडवली येथील ५० एकरांवरील बांबू प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान आणि बांबू लागवडीच्या संधींबाबत माहिती देत इच्छुक शेतकऱ्यांचे अर्जही भरून घेतले. तसेच ग्रामसेवक पोपट कुसुम भोरजे यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक पाठपुरावा करून जागेचे जिओ-टॅगिंग पूर्ण केले.

टाइम्स स्पेशल

भावेश कारेकर यांनी मंडणगड आणि दापोली तालुक्यात २,००० एकरांहून अधिक क्षेत्रावर बांबू लागवड विकसित करून त्यावर आधारित उद्योग उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न, स्थानिक युवकांना रोजगार आणि पर्यावरणपूरक औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मांदिवलीतील हा उपक्रम ग्रामीण भागातील शाश्वत विकासाचा आदर्श ठरत असून, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणारे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg