loader
Breaking News
Breaking News
Foto

कुठच्याही परिस्थितीत वायरी भूतनाथ गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही; ग्रामस्थांचा वीज विभागाला आक्रमक इशारा

मालवण(प्रतिनिधी)- वीज महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याच्या कार्यवाही विरोधात आक्रमक बनलेल्या वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधीनी आज मालवण येथील वीज कार्यालयात धडक देऊन अभियंत्यांना जाब विचारला. आम्ही कुठच्याही परिस्थितीत वायरी गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही, आक्रमक असा इशारा वायरी-भूतनाथ ग्रामस्थांनी दिला. यासंदर्भात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे. वायरी भूतनाथ ग्रामस्थांनी वीज महावितरण प्रशासनासमोर आपले प्रमुख आक्षेप नोंदवले. यात ज्या ठिकाणी हे मीटर बसवण्यात आले आहेत, तेथे दुप्पट-तिप्पट बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पुढे जाऊन ’प्रिपेड सिस्टीम’ लागू होण्याची भीती असून ही पद्धत अन्यायकारक ठरेल. सध्याचे डिजिटल मीटर्स सुरळीत सुरू असताना नवीन मीटर सक्तीने बसवण्याची कोणतीही गरज वाटत नाही. ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध किंवा सक्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास निर्माण होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता सचिन मेहेत्रे यांनी महावितरणची बाजू मांडताना ही केंद्र शासनाची योजना असून याद्वारे ’टाईम ऑफ द डे’ नियमावली लागू करायची आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्मार्ट मीटर अतिशय महत्त्वाचे असून कुठे शॉर्टसर्किट झाल्यास ते तत्काळ दर्शवते. तसेच यामुळे अचूक बिल मिळण्यास मदत होते. आतापर्यंत ७,४०० जणांनी स्मार्ट मीटर बसवले असून हे मीटर सर्वांच्या फायद्याचेच आहेत, असे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसविण्यास आपला विरोधच असल्याचे स्पष्ट करत स्मार्ट मीटर बसविण्यासाठी वीज कर्मचार्‍यांनी गावात फिरकू नये असेही ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तेजस लुडबे, देवानंद लुडबे, देवानंद लोकेगावकर, मनोज लुडबे, संजय लुडबे, पराग माणगावकर, विश्वास लुडबे, एकनाथ फणसेकर, गणपत म्हसकर, राजाराम माडये, आनंद गावडे, समीर तळगावकर, दर्शन वेंगुर्लेकर, प्रकाश सावंत, गणेश परब, दीपक कुडाळकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg