loader
Breaking News
Breaking News
Foto

वृक्षतोडीनंतरही हरित संकल्प कायम; ‘क्षितीज कलामंच दापोली’चा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम

दापोली :- सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ‘क्षितीज कलामंच दापोली’तर्फे गेल्या वीस वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून लावण्यात आलेली आंबा, काजू तसेच विविध फळझाडे, फुलझाडे व औषधी वनस्पती आज अनेक शेतकर्‍यांना उत्पन्नाचे साधन ठरत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाळंदे येथे कलामंचाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या सुमारे ३०० झाडांपैकी बहुतांश झाडे रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आली. मात्र, त्यापैकी सुमारे २५ झाडे आजही त्या कार्याची साक्ष देत उभी असून, पाळंदे ग्रामस्थांनी त्यांना पाणी घालून जिवापाड जपले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वृक्षतोडीनंतरही खचून न जाता ‘क्षितीज कलामंच दापोली’ने पर्यावरण संवर्धनासाठी नवी संकल्पना राबविली आहे. वर्षभरात ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी किमान दोन झाडे शेतकर्‍यांना भेट द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. कलामंचाच्या माध्यमातून ही झाडे संबंधित शेतकर्‍यांच्या जागेवर जाऊन लावली जात आहेत. या उपक्रमाची माहिती मिळताच एका वृक्षप्रेमीने विविध गावांसाठी लागणारी ५० झाडे उपलब्ध करून दिली. तसेच पाळंदे गावात ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी पहिले झाड तोडण्यात आले होते, त्याच परिसरात रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर पहिले कडुनिंबाचे झाड वैभव (बबलू) तवसाळकर यांच्या जागेत लावण्यात आले. यासाठी शरद (बावा) तवसाळकर यांनी मोलाचे सहकार्य करत पावसाळ्यानंतरही झाडांना नियमित पाणी घालून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. उपक्रमात झाडे देणारे आणि झाडे स्वीकारणारे प्रत्येक व्यक्तीशी पत्र तसेच मोबाईल संदेशाद्वारे संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या उपक्रमामुळे समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्याबरोबरच निसर्गाविषयी आत्मीयता निर्माण होत आहे.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण उपक्रमासाठी ‘क्षितीज कलामंच दापोली’चे अध्यक्ष अभिजित भोंगले यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणार्‍या सर्व वृक्षप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांचे ‘क्षितीज कलामंच दापोली’तर्फे आभार मानण्यात आले असून, प्रत्येकाच्या मनात निसर्गाविषयीचे प्रेम असेच वृद्धिंगत होत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg