loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत २९ दिव्यांगांना ई-वाहनांचे वाटप, ह्युंदई मोबीजच्या सीएसआर उपक्रमातून स्वावलंबनाचे नवे पाऊल

रत्नागिरी (जमीर खलफे) - ह्युंदई मोबीज यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत मोबीज इंडिया फाऊंडेशनमार्फत, निओ मोशन च्या सहयोगाने तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील २९ दिव्यांग लाभार्थ्यांना अत्याधुनिक निओ मोशन ई-वाहनांचे आणि अतिरिक्त बॅटरीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लांजा, राजापूर आणि दापोली तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार असून रोजगार, शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. अतिरिक्त बॅटरीमुळे दिव्यांगांना अधिक अंतराचा प्रवास करणे शक्य होणार असून त्यांच्या उपजीविकेला मोठी चालना मिळणार आहे. या मुख्य कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही मनोज रानडे यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी या निओ मोशन ई-वाहनांचा प्रभावी वापर करून दिव्यांगांनी स्वावलंबी जीवन जगावे, रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घ्यावा आणि आत्मविश्वासाने समाजात पुढे जावे, असे आवाहन केले. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद भविष्यातही सर्वतोपरी आणि सकारात्मक सहकार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मोबीज इंडिया फाऊंडेशनच्या सीएसआर टीम सदस्य रोशिना यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. ह्युंदई मोबीज च्या माध्यमातून देशभरातील ६ राज्यांमध्ये एकूण ६०० निओ मोशन ई-वाहनांचे वितरण केले जात असून महाराष्ट्रासाठी ६० वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी नागपूरमध्ये २० आणि रत्नागिरीत २९ वाहनांचे वितरण पूर्ण झाले असून उर्वरित वाहने मुंबईत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांनी या वाहनांच्या साहाय्याने शिक्षण, उद्योग आणि स्वावलंबनाची वाट धरून आत्मविश्वासाने प्रगती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते, दीपक आंबवले आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी कृणाल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या साक्षी चाळके, कल्पेश साखरकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये सामाजिक प्रतिनिधी समीर नाकाडे आणि सादिक नाकाडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे, त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे, निवड प्रक्रिया राबवणे आणि कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आयआयटी मद्रासच्या तंत्रज्ञानावर आधारित निओ मोशन ही एक अभिनव प्रणाली असून, ती साध्या मॅन्युअल व्हीलचेअरचे अवघ्या काही सेकंदांत अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करते. या तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वतंत्र आणि सन्मानजनक जीवन जगणे शक्य होत आहे. उद्योग, सामाजिक संस्था आणि शासन यांच्यातील प्रभावी भागीदारीचा हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या गतिशीलतेसह त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg