loader
Breaking News
Breaking News
Foto

काही झाले तरी जगवायचेच! संगमेश्वरच्या तरुणांची जिद्द अन् चिकाटी ठरली फलदायी; निपचित पडलेली गोमाता उपचारांनंतर पुन्हा उभी!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संकट कितीही मोठे असू दे आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे, जर मनात दृढ संकल्प, जिद्द आणि चिकाटी असेल तर मृत्यूच्या दारातूनही प्राणांचे रक्षण करता येते! संगमेश्वरच्या महामार्ग उड्डाणपुलावर झालेल्या अपघातातील जखमी गाईच्या बाबतीत याच जिद्दीचा आणि अथांग पशुप्रेमाचा प्रत्यय आला आहे. भीषण धडकेनंतर अत्यंत जखमी अवस्थेत रस्त्यावर निपचित पडलेल्या गोमातेला वाचवण्यासाठी स्थानिक तरुणांनी काही झाले तरी हिला जगवायचेच! हा बांधलेला चंग अन् दाखवलेली चिकाटी आज रंग आणत असून, उपचारांनंतर ती गाय स्वतःच्या पायावर उठून उभी राहिली आहे. महामार्गावरून जाणार्‍या एका अज्ञात वाहनाने गोमातेला अत्यंत भीषण धडक दिली आणि मदत करण्याऐवजी चालक गाडी घेऊन पसार झाला. जबर मार लागल्यामुळे ती निष्पाप गाय अतिशय वाईट परिस्थितीत महामार्गावर निपचित पडली होती. ती बोलू शकत नव्हती, की वेदनेने हाक मारू शकत नव्हती. सुरुवातीला तिथून जाणार्‍या-येणार्‍यांना ती मृत झाली असावी असाच समज झाला. परंतु, तिच्या शरीरात चालू असलेला सूक्ष्म श्वास आणि तिची मूक वेदना संगमेश्वरच्या संवेदनशील तरुणांच्या नजरेतून सुटली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच अभिषेक खातू, वेदांत डिंगणकर, ओमकार लोध, अनिकेत खातू, अजिंक्य लोध, अमोल शिवलकर, आकाश शेट्ये, प्रकाश खातू आणि नाना भिंगार्डे या तरुणांनी स्वतःचे धंदे, व्यवसाय आणि हातातील कामे तात्काळ बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. गाय निपचित पडलेली पाहून सुरुवातीला चिंता व्यक्त झाली, पण तिची हालचाल तपासून तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना पाचारण केले. रात्रीची वेळ, डोक्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि उड्डाणपुलावरील गदड अंधार... अशा भीषण परिस्थितीत मोबाईलच्या विजेच्या प्रकाशात उपचार सुरू झाले. जेव्हा प्रथमोपचारानंतर गाईच्या शरीरात मंद हालचाल सुरू झाली, तेव्हा या तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी आता काहीही झाले, कितीही वेळ लागला तरी माघार घ्यायची नाही; या गाईला जगवायचेच! असा ठाम निश्चय केला. पावसाच्या पाण्यापासून आणि थंडीपासून तिचे रक्षण करण्यासाठी या तरुणांच्या चिकाटीने पुढचे पाऊल उचलले. त्यांनी तातडीने जेसीबीची व्यवस्था केली. गाईला कोणतीही अतिरिक्त दुखापत होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत अगदी अलगद तिला संगमेश्वर एसटी स्टँडसमोरील पुलाखाली कोरड्या जागी हलवले. रात्रभर स्वतः पावसात भिजत त्यांनी तिच्या खाण्या- पिण्याची आणि औषधांची काळजी घेतली. दुसर्‍या दिवशी सकाळी एका चारचाकी वाहनातून तिला सुरक्षितपणे ‘गोशाळेत’ दाखल करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

अनेकदा लोक अपघातात मदत करून निघून जातात; मात्र या तरुणांचे पशुप्रेम आणि जबाबदारी तिथेच संपली नाही. गोशाळेतील उत्तम व्यवस्थापनावर पूर्ण विश्वास असतानाही, हे तरुण नियमितपणे गोशाळेत जाऊन गाईच्या प्रकृतीची, खाण्यापिण्याची आणि उपचारांची चौकशी करत आहेत. तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला प्रेमाचा धीर देत आहेत. या तरुणांची हीच जिद्द, डॉक्टरांचे वेळेवर झालेले उपचार आणि गोशाळेतील सुश्रूषा यामुळे अखेर चमत्कार घडला! जी गाय अपघाताच्या रात्री निपचित पडली होती, नंतर उपचारांना प्रतिसाद देत जाग्यावर बसली होती, तीच गाय आज पूर्णपणे सावरून स्वतःच्या पायावर उठून उभी राहत आहे. स्वतःचे कामधंदे सोडून, भर पावसात आणि अंधारात एका मुक्या जीवाच्या प्राणासाठी धडपडणार्‍या अभिषेक खातू, वेदांत डिंगणकर, ओमकार लोध, अनिकेत खातू, अजिंक्य लोध, अमोल शिवलकर, आकाश शेट्ये, प्रकाश खातू आणि नाना भिंगार्डे या सर्व तरुणांच्या या अखंड जिद्दीचे, चिकाटीचे आणि प्राणिदयेचे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून भरभरून कौतुक होत असून, त्यांच्या या कार्याला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg