loader
Breaking News
Breaking News
Foto

चैतन्य आर्ट, चिपळूणतर्फे सहा मान्यवरांचा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव

संगमेश्वर (प्रतिनिधी) : चैतन्य आर्ट, चिपळूण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच आषाढी वारी महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षाचे औचित्य साधत समाज, शिक्षण, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सहा मान्यवरांना राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या भव्य रंगमंचावर भक्तिमय वातावरणात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आषाढी वारीच्या भक्तिरसपूर्ण वातावरणात झाली. सुप्रसिद्ध गायिका उत्तरा भागवत साडविलकर तसेच गायक बापट यांनी श्री विठ्ठलाच्या अभंग आणि भक्तिगीतांचे सुमधुर सादरीकरण केले. त्यांच्या गायनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. “जय जय रामकृष्ण हरी” आणि “जय हरी विठ्ठल” या नामघोषांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे चिपळूण येथील महिला मंडळाने सादर केलेली पारंपरिक पालखी मिरवणूक आणि दिंडी. फुगडी, जात्यावर दळण, पारंपरिक खेळ तसेच वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात उपस्थितांनी भक्तिमय वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यंदाच्या पुरस्कारासाठी संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे, कराड (जि. सातारा) येथील यशवंत कुलकर्णी व विनायक कुलकर्णी, चिपळूण येथील राघो ग. अंबावकर, सुभाष बुरटे (पेठमाप) आणि अनंत साळवी (पोफळी) यांची निवड करण्यात आली. पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, आकर्षक स्मृतिचिन्ह (शील्ड) आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्याला चैतन्य आर्ट संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीप संकपाळ, सचिव अरविंद जोगळे यांच्यासह प्रकाश देशपांडे, बापू काणे, डॉ. प्रणव माळी, दामिनी माळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी वारीच्या भक्तिमय संगीताचा आनंद घेण्यासाठी आणि पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा अनुभवण्यासाठी चिपळूण व परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी वक्त्यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करत समाजसेवा, शिक्षण, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांद्वारे सन्मानित केल्याने समाजात प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg